७३ दिवसांत ४३ वेळा इंधनाची दरवाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 23:58 IST2018-09-17T23:58:03+5:302018-09-17T23:58:28+5:30
१६ शहरांनी पार केला नव्वदीचा आकडा; आठ वेळा किंचित घसरण; सामान्यांची होरपळ

७३ दिवसांत ४३ वेळा इंधनाची दरवाढ
मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी मागील ७३ दिवसांत ४३ वेळा इंधन दरात वाढ केली. ६ जुलै ते १७ सप्टेंबर दरम्यान पेट्रोल ६.३१ व डिझेल ६.५९ रुपये प्रति लिटरने महागले. फक्त आठ वेळा दरांमध्ये किंचित घसरण झाली.
इंधनाचे दर भडकत असल्याने सामान्यांची होरपळ सुरूच आहे. डिझेलवर धावणारे ट्रक, टेम्पो, बसेस यांचे भाडे वाढल्याने दैनंदिन गरजेचा भाजीपाला, धान्य महागले आहे. दुचाकी वापरणाऱ्यांच्या दैनंदिन खर्चात मोठी वाढ झाली आहे.
रविवारपर्यंत राज्यात १३ ठिकाणी पेट्रोल नव्वदीच्या पुढे होते. कंपन्यांनी सोमवारी पुन्हा पेट्रोल १५ पैसे व डिझेल ६ पैसे महाग केले. त्यामुळे नव्वदीत आणखी तीन शहरांची भर पडली. सातारा (९०.०१), सोलापूर (९०.१२) व वाशिम (९०.०१) यांचा त्यात समावेश आहे. परभणीतील पेट्रोलचा दर ९१.२८ रुपये प्रति लिटरसह अद्यापही देशात सर्वाधिक आहे. सोमवारी नांदेडमधील पेट्रोल दरही ९१.०९ रुपये प्रति लिटरवर पोहोचला. राज्यात चार ठिकाणी डिझेलही ७९ रुपयांच्यावर आहे. अमरावती (७९.७०), औरंगाबाद (७९.४७), नंदूरबार (७९.५९) व सोलापूर (७९.०४) यांचा त्यात समावेश आहे. मुंबईसह आठ ठिकाणी डिझेल ७८ रुपयांहून अधिक आहे. उर्वरित ठिकाणी ते ७७ ते ७८ रुपये प्रति लिटरच्या आसपास आहे.