लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अटल सेतूवर आता तुमच्या इलेक्ट्रिक वाहनाला टोल लागणार नाही. खासगी तसेच सरकारी इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांना अटल सेतूवर गुरुवार, २१ ऑगस्टपासून टोल माफी करण्यात आली असून उद्या, शुक्रवारपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. एप्रिल महिन्यात केलेली घोषणा अटल सेतूवर आता अमलात येणार असून राज्यातील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व समृद्धी महामार्ग या दोन महामार्गावरही येत्या दोन दिवसांत लागू होण्याचे संकेत आहेत.
इलेक्ट्रिक वाहनांसाठीची ही टोल माफी राज्य सरकारकडून वाहतूक क्षेत्रातून होणारे कार्बन, प्रदूषणकारी वायू आणि हरित गृह वायू उत्सर्जन रोखण्यासाठी एप्रिल महिन्यात महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर करण्यात आले. त्यात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू आणि समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व चारचाकी इलेक्ट्रिक वाहने आणि बसेसना टोल माफी जाहीर करण्यात आली होती. तर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांना टोलमध्ये ५० टक्के सवलत देण्याची घोषणाही करण्यात आली होती.
या वाहनांना टोलमाफी
इलेक्ट्रिक बसेस, खासगी व प्रवासी हलकी चारचाकी वाहने, राज्य परिवहन तसेच शहरी परिवहन उपक्रमांची प्रवासी वाहने.(मालवाहक इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी नाही)
अटल सेतूवर टोल नाके कुठे?
शिवाजीनगर, गव्हाण
मुंबई इलेक्ट्रिक वाहने किती?
- हलकी चारचाकी- १८,४००
- हलकी प्रवासी वाहने- २,५००
- अवजड प्रवासी वाहने- १,२००
- मध्यम प्रवासी वाहने- ३००
एकूण- २२,४००
रोज किती वाहने धावतात?
- ६०,००० अटल सेतू
- ३४-४० हजार समृद्धी महामार्ग
- २२,००० मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग