अन्नत्याग करणाऱ्या जरांगेंच्या समर्थनार्थ हॉटेलमध्ये १५ दिवस मोफत जेवण, अट एकच
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 17:24 IST2023-11-03T17:24:15+5:302023-11-03T17:24:45+5:30
मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अन्नत्याग करणाऱ्या जरांगेंच्या समर्थनार्थ हॉटेलमध्ये १५ दिवस मोफत जेवण, अट एकच
मुंबई - मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग उपोषण करुन मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला जेरीस आणले. राज्यातील सकल मराठा समाज बांधवांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ राज्यभर साखळी उपोषण सुरू केले. अखेर, सरकारने वेळ आणि तारीख निश्चित केल्यानंतर, मराठा समाजला सरसकट कुणबी प्रमाणत्रप देणार असल्याचे मान्य केल्यानंतरच जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले. मात्र, या काळात राज्यभरातून जरांगे पाटील यांना समर्थन वेगवेगळ्या प्रकारे मिळाले. त्यापैकी, एका हॉटेल मालकाने हटके समर्थन दिलं आहे. त्यानुसार, ज्या व्यक्तीचं नाव मनोज आहे, त्या व्यक्तीस हॉटेलमध्ये मोफत जेवणार मिळणार आहे.
मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सुरू केलेली मोफत जेवण देण्याची स्कीम एका हॉटेल मालकाने आणखी १५ दिवसांपर्यंत वाढवली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड येथे अमृत हॉटेलचे मालक बाळासाहेब भोजने यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला हटके समर्थन दिले. भोजने यांच्या हॉटेलमध्ये, 'मनोज' नावाच्या व्यक्तीला मोफत जेवण देण्यात येत आहे, त्यासाठी आधार कार्डवरुन नावाची खात्री केली जात आहे.
जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ भोजने यांनी २३ ऑक्टोबरपासून १ नोव्हेंबरपर्यंत हे मोफत जेवण देण्याची घोषणा केली होती. मात्र, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा निघाल्यामुळे, तसेच जरांगे यांनी उपोषण सोडल्यामुळे त्यांनी ही स्कीम आणखी वाढवली असून त्यात १५ नोव्हेंबरपर्यंत मोफत जेवण दिले जाणार आहे. त्यासाठी एकच अट आहे, ती म्हणजे व्यक्तीचं नाव मनोज असलं पाहिजे.
दरम्यान, जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ लाखो मराठा बांधव रस्त्यावर उतरले होते. तर, त्यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी गावातही अनेकांनी मुक्काम ठोकला. राज्यभरातून जरांगे पाटील यांच्या आंदोलने करण्यात आली. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळणही लागले. मात्र, जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला शांततेचं व तोडफोड न करण्याचं आवाहन केलं होतं.