फसवी कर्जमाफी... फडणवीस अन् ठाकरे सरकारच्या काळातही शेतकरी त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2020 13:10 IST2020-10-18T13:09:19+5:302020-10-18T13:10:03+5:30
बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने राजकीय नेत्यांबद्दल स्पष्टपणे भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या शेताच्या बांधावर आजी आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या फोटोचा फ्लेक्स लावून शेतकरी बांधवांची खंत शेतकरी नीलकंठ लिपते यांनी व्यक्त केली.

फसवी कर्जमाफी... फडणवीस अन् ठाकरे सरकारच्या काळातही शेतकरी त्रस्त
मुंबई - मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात यंदा पावसाने धुमाकूळ घातला आहे. नुकतंच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून राजकीय नेत्यांकडू पाहणी दौरे सुरू आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. शेतकऱ्यांचा आक्रोश आणि संताप यावेळी पाहायला मिळत आहे. विदर्भातील एका शेतकऱ्याने अद्याप मला कुठलिही कर्जमाफी मिळाली नसल्याचे सांगत, आजी-माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने राजकीय नेत्यांबद्दल स्पष्टपणे भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या शेताच्या बांधावर आजी आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या फोटोचा फ्लेक्स लावून शेतकरी बांधवांची खंत शेतकरी नीलकंठ लिपते यांनी व्यक्त केली. 2 एकर शेतीचे मालक असलेल्या नीलकंठ यांच्यावर सध्या बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्ज आहे. संग्रामपूर येथील शाखेतून त्यांनी शेतीवर कर्ज घेतलं होतं, ते आता 1.48 लाख रुपये एवढं आहे. नीलकंठ यांनी फडणवीस सरकारच्या काळातही कर्जमाफीसाठी अर्ज केला होता, त्यानंतर आता ठाकरे सरकारच्या काळातही त्यांना कर्जमाफी मिळाली नाही. त्यामुळे, उद्विग्न होऊन त्यांनी ही बॅनरबाजी केली आहे.
भिलखेड गावातील त्रस्त शेतकऱ्याने आपल्या शेतात फ्लेक्स लावला असून फसवी कर्जमाफी असा मथळा या फ्लेक्सवर लिहिला आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो या फ्लेक्सवर झळकावले असून या दोन्ही सरकारच्या काळात मला कर्जमाफी झालीच नाही, असे शेतकरी नीलकंठ लिपते यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे गावातील 60 टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याची खंत अतिशय त्रस्तपणे गावकरी सांगत आहेत.