सरकारी नोकरीच्या आमिषाने फसवणूक; दोन स्वतंत्र गुन्हे दाखल, ७५ लाख रुपयांची लूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 11:05 IST2025-10-22T11:04:45+5:302025-10-22T11:05:35+5:30
शिपाई पदासाठी साडेचार लाख रुपये मागितले.

सरकारी नोकरीच्या आमिषाने फसवणूक; दोन स्वतंत्र गुन्हे दाखल, ७५ लाख रुपयांची लूट
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विक्रोळी पोलिसांनी दोन व्यक्तींविरोधात सरकारी नोकरी आणि कॅन्सर रुग्णांना स्वस्त दरात घर मिळवून देण्याचे आमिष दाखवून ७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. कैलास चोखा किर्तने (४३) आणि योगेश जगन्नाथ पाटणकर (५०) अशी आरोपींची नावे आहेत.
पहिल्या घटना टागोर नगर परिसरात राहणाऱ्या दिलीप बाबू होवाळ (६३) यांच्या बाबतीत घडली आहे. होवाळ यांची २०१८मध्ये कैलास किर्तनेशी ओळख झाली. किर्तनेने मंत्रालयात लिपीक किंवा शिपाई म्हणून सरकारी नोकरी मिळवून देतो, असे सांगून होवाळ यांच्याकडून रोख आणि चेकद्वारे १२ लाख रुपये घेतले. होवाळ यांनी आपली भाची, भाचा आणि इतर नातेवाइकांनाही नोकरी लावण्यासाठी किर्तने आणि पाटणकर यांना ३३.५ लाख रुपये दिले. मात्र, आरोपींनी कुणालाही नोकरी मिळवून दिली नाही. पैसे परत मागितल्यावर आरोपींनी शिवीगाळ करून धमकावले आणि पुन्हा फोन केलास, तर घरी येऊन मारहाण करू, अशी धमकी दिली.
स्वस्त घराचेही प्रलोभन
दुसरी घटना कन्नमवार नगर येथील जितेंद्र ठोकळे यांच्या संदर्भात घडली. २०२२ मध्ये त्यांची आरोपी किर्तनेशी ओळख झाली. आपला मित्र पाटणकर मंत्रालयात मंत्र्याचा सचिव असून, तो बांधकाम खात्यात लिपीक आणि शिपाई पदावर नोकरी मिळवून देतो, असे त्याने ठोकळे यांना सांगितले आणि लिपीक पदासाठी सहा लाख, तर शिपाई पदासाठी साडेचार लाख रुपये मागितले.
दुसऱ्या गुन्ह्यातील तक्रारदार ठोकळे
यांची मोठी बहीण कॅन्सर रुग्ण आहे. तिला राज्य सरकारच्या योजनेतून कमी पैशांत घर मिळवून देण्याचे प्रलोभनही आरोपींनी दाखवले. किर्तने आणि पाटणकर यांनी ठोकळे यांच्याकडून ३० लाख रुपये उकळले. ठोकळेंनी पैसे परत मागितल्यावर त्यांना धमकावण्यात आले.