बेस्टचा कर्मचारी असल्याचे भासवत वीज ग्राहकांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 18:32 IST2020-12-02T18:31:50+5:302020-12-02T18:32:06+5:30
Fraud of power consumers : लोकांकडून पैसे घेत तो लोकांची फसवणूक करत आहे.

बेस्टचा कर्मचारी असल्याचे भासवत वीज ग्राहकांची फसवणूक
मुंबई : भूलेश्वर, मलबार हिल या परिसरात जोहर हकीमुद्दीन भोपाळवाला नावाचा इसम बेस्टचा कर्मचारी असल्याचे भासवत ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. बनावट ओळखपत्र आणि अब्दुल सादिक या बनावट नावाचा आधार घेत बेस्ट कर्मचारी असल्याचे भासवत आहे. बेस्ट संबधित काम करून घेण्यासाठी लोकांकडून पैसे घेत तो लोकांची फसवणूक करत आहे. त्याने अनेक जणांची फसवणूक केली असून, त्याच्या विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.
बेस्टकडून याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बेस्ट उपक्रमाने कोणत्याही खासगी व्यक्तीस वीज ग्राहकांकडून रोख रक्कम अथवा धनादेश स्वीकारण्यासाठी प्राधिकृत केलेले नाही. परिणामी अशा लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन बेस्टने केले आहे. अशा प्रकाराची घटना आढळल्यास त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात बेस्ट उपक्रमाच्या विद्युत पुरवठा शाखा आणि दक्षता विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तर याबाबत बेस्ट उपक्रमाकडे ८ तक्रारी आल्या असून कुलाबा पोलीस ठाण्यात ३ आणि मलबार हिल येथील पोलीस ठाण्यात २ तक्रारींची नोंद झाली आहे.