ओएलएक्सवर वस्तू विकत घेण्याच्या नावाखाली फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 02:25 AM2019-08-03T02:25:51+5:302019-08-03T02:26:15+5:30

गुन्हा दाखल; एकाच ठगाकडून सात तासांत दोघांना गंडा; लष्करात नोकरीला असल्याचे सांगत लुबाडले

Fraud in the name of buying goods on OLX | ओएलएक्सवर वस्तू विकत घेण्याच्या नावाखाली फसवणूक

ओएलएक्सवर वस्तू विकत घेण्याच्या नावाखाली फसवणूक

Next

मुंबई : ओएलएक्सवरून वस्तू विकत घेण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या विकास पटेल नावाच्या व्यक्तीविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवघ्या सात तासांत त्याने दोघांची फसवणूक केली आहे. कांदिवलीच्या आकुर्ली भागात राहणारा तेजेश्वर व्यंकटेश्वरप्रसाद नुक्का (२७) हा तरुण एका कंपनीत फोटोग्राफीचे काम करतो. त्याच्या कंपनीचे सर्व व्यवहार गुगल पेवरून केले जातात. त्याच्या कंपनीच्या मालक महिलेने २० हजारांत फ्रीज विकण्याबाबत ओएलएक्सवर जाहिरात दिली होती. ती पाहून विकास पटेल नावाची व्यक्ती इच्छुक असल्याने, त्यांनी नुक्काला त्याच्याशी बोलून घेण्यास सांगितले. त्यानुसार, २९ जुलै रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास नुक्काने पटेलशी संपर्क साधला. तेव्हा, पटेलने गुगल अ‍ॅप आहे. मात्र ते वापरता येत नसल्याचे सांगितले. पुढे त्याने, दोन लिंक नुक्काच्या मोबाइलवर पाठविल्या. त्यात, १० हजार रुपयांचे दोन व्यवहार झाल्याचे दिसले. त्यांनी या लिंकवर क्लिक करताच त्यांच्या कंपनीच्या खात्यातून २० हजार रुपये काढल्याचा संदेश धडकला. याबाबत त्यांनी पटेलकडे विचारणा करताच त्याने तो आर्मीमध्ये नोकरीला असून, ते पैसे तत्काळ खात्यात रिफंड होतील, असे सांगितले. मात्र, बराच वेळ वाट पाहूनदेखील काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पटेल नॉट रिचेबल झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नुक्काने पोलिसांत तक्रार केली.

या घटनेपाठोपाठ ताडदेवमध्ये व्यावसायिकाच्या मुलीला २८ हजार रुपये गमवावे लागले. ४ जुलै रोजी तक्रारदार मुलीच्या बहिणीने ओएलएक्सवर ७ हजार रुपयांत आॅपीलिऐटर हेअर रिमूव्हर विकण्यासाठी टाकले होते. २९ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास विकास पटेल नावाच्या व्यक्तीने त्यांना कॉल करून रिमूव्हर घेण्यासाठी पुढाकार घेतला. त्याने गुगल पेवरून पेमेंट करतो, असे सांगितले. त्यानुसार, त्याला गुगल पेच्या अकाउंटचा तपशील देण्यात आला. पुढे, पैसे देण्याच्या नावाखाली त्याने, त्यांच्या खात्यातून वेगवेगळे व्यवहार करून २८ हजार रुपये काढले. याबाबत संबंधिताला विचारणा करताच तो नॉट रिचेबल झाला. तरुणीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानुसार ताडदेव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
पटेल नावाच्या व्यक्तीने अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू आहे.

बॅगेचा व्यवसाय करण्याच्या बहाण्याने फसविले
चुनाभट्टी परिसरात राहणाºया तक्रारदार महिलेचा बॅग विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी इंडिया मार्टवर बॅगेबाबत जाहिरात दिली होती. २८ जुलै रोजी जयकिशन नावाच्या व्यक्तीने तक्रारदार महिलेला फोन करून बॅगेबाबत विचारणा केली. तसेच स्वत: जवान असल्याचे सांगून बॅगेचा व्यवसाय करायचा असल्याने १०० बॅगची आॅर्डर दिली. ६० हजार रुपयांत व्यवहार झाला. त्यापैकी ३० हजार रुपये आगाऊ रक्कम देण्यास सांगितली. त्याला अकाऊटचा तपशील पाठवला. मात्र त्याने, गुगल पे अकाऊंटची मागणी केली. त्यानंतर महिलेचा विश्वास संपादन करून त्यांच्या अकाऊंटमधून १५ हजार रुपये काढले. त्यानंतर, जयकिशनने संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदार महिलेने चुनाभट्टी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

Web Title: Fraud in the name of buying goods on OLX

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.