रिपब्लिक टीव्हीचे चार अधिकारी सीआययूच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 01:49 AM2020-12-14T01:49:53+5:302020-12-14T07:07:08+5:30

सबळ पुरावे हाती; सीओओ प्रिया मुखर्जीला अटकपूर्व जामीन; अन्य आराेपींचा शाेध सुरू

Four Republic TV officials on CIUs radar | रिपब्लिक टीव्हीचे चार अधिकारी सीआययूच्या रडारवर

रिपब्लिक टीव्हीचे चार अधिकारी सीआययूच्या रडारवर

Next

मुंबई : टीआरपी घोटाळ्यात अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे वितरण प्रमुख घनश्याम सिंग यांच्या चौकशीतून महत्त्वपूर्ण पुरावे, व्हाॅट्सॲप चॅट सीआययूच्या हाती लागले आहेत. रिपब्लिकचे चार अधिकारी सीआययूच्या रडावर आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिया मुखर्जी यांच्या सांगण्यावरून त्यांनी टीआरपीसाठी पैसे पुरविल्याची माहिती समोर आली. दुसरीकडे मुखर्जी यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने सीआययूने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

रिपब्लिक टीव्हीविरोधात सबळ पुरावे सीआययूच्या हाती लागले आहेत. त्यानुसार रिपब्लिकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मुखर्जी यांच्यासह मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) सुब्रमण्यम सुंदरम, अधिकारी शिवेंद्र मुलहेकर, रणजीत वॉल्टर यांच्यासह रिपब्लिक टीव्ही चॅनेल्सचे मालक, चालक आणि संबंधित व्यक्तींना पाहिजे आरोपी म्हणून दाखविले आहे. त्यांच्यासह महामूव्ही चॅनेल्सचे अमित दवे, संजय वर्मा तसेच अन्य पदाधिकारी, वॉव म्युझिक चॅनेल्सचे पदाधिकारी आणि रॉकी व अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

यात, रिपब्लिकचे सुंदरम, मुलहेकर आणि वॉल्टर यांच्या घरी पथकाने धाव घेतली, मात्र ते सापडले नाहीत. तसेच घनश्याम याच्या जप्त केलेल्या लॅपटॉपमधून या गैरप्रकाराबाबतची महत्त्वपूर्ण माहिती सीआययूच्या हाती लागली आहे. लॅपटॉपमध्ये केबल ऑपरेटर्स मल्टिसिस्टीम ऑपरेशन यांच्याकडून ड्युएल एलसीएनसंदर्भात काम केले आहे. तसेच त्यांच्या इर्मेल आयडीवर त्यासंदर्भातले मेलही सापडले आहेत. त्यात घनश्यामने टीआरपीसाठी पैसे दिल्याचेही स्पष्ट झाले. त्यानुसार १२ आरोपींविरुद्ध २४ नोव्हेंबर रोजी दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.

विकास खानचंदानी हे रिपब्लिक चॅनेल्स चालविणाऱ्या एआरजी आऊटलीयर मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सीईओ आहेत. त्यामुळे या गैरप्रकारात त्यांचा सहभाग स्पष्ट होताच त्यांना अटक झाली.

संभाषणही लागले हाती
मुखर्जी यांना अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर झाल्यानंतर त्या सीआययूकडे हजर झाल्या. त्यांचा मोबाइल पथकाने ताब्यात घेतला आहे. त्या कंपनीकडून चालविण्यात येणाऱ्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या सदस्या आहेत. त्या ग्रूपमध्ये ते चालवत असलेले रिपब्लिक भारत हिंदी आणि इंग्रजी न्यूज चॅनेल्सबाबत केलेल्या गैरप्रकाराबाबतचे संभाषणही सापडले आहे. त्यानुसार पथक अधिक तपास करत आहे.

घोटाळ्यात ड्युअल फ्रिक्वेन्सीचा वापर
ग्राहकांना फितवण्यासोबत केबल चालक किंवा मल्टी सीस्टिम ऑपरेटर्सना (एमएसओ) हाताशी धरून ‘ड्युअल फ्रिक्वेन्सी’चा वापरही रिपब्लिकने केल्याचे गुन्हे शाखेने स्पष्ट केले आहे. आतापर्यंतच्या तपासात कंपनीच्या ‘सीओओ’ प्रिया मुखर्जी यांनी ड्युअल फ्रिक्वेन्सीद्वारे रिपब्लिक वाहिन्यांचे टीआरपी वाढविण्याबाबत घनश्याम यांना स्पष्ट सूचना दिल्याचे स्पष्ट झाले. मुखर्जी खानचंदानी यांच्या हाताखाली काम करतात. त्यामुळे त्यांना या सूचना खानचंदानी यांच्याकडून प्राप्त झाल्याचा संशय असून, त्या दृष्टीने तपास सुरू आहे.

Web Title: Four Republic TV officials on CIUs radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.