शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'विशेष टपाल तिकीट' जारी करा; राहुल शेवाळेंची केंद्राकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 19:10 IST2026-02-17T19:09:24+5:302026-02-17T19:10:56+5:30
केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना शेवाळे यांनी दिलेल्या लेखी निवेदनाबाबत केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'विशेष टपाल तिकीट' जारी करा; राहुल शेवाळेंची केंद्राकडे मागणी
मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून, 'विशेष टपाल तिकीट' जारी करण्याची मागणी शिंदे सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस, माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना शेवाळे यांनी दिलेल्या लेखी निवेदनाबाबत केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे.
आपल्या निवेदनात शेवाळे यांनी शिवसेनाप्रमुखांचा सामाजिक आणि राजकीय योगदानाचा उल्लेख केला आहे. १९६० च्या दशकापासून पुढची ५० वर्षे बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय पटलावर महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एक हिंदुत्ववादी लोकनेता, महान व्यंगचित्रकार, श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा वक्ता अशा विविध रूपांत बाळासाहेबांनी नेहमीच आपली भूमिका परखडपणे मांडली. त्यांची लेखणी, त्यांची भाषणे आणि त्यांच्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून त्यांनी सामान्य माणसाच्या मनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग जागविले, असेही शेवाळे यांनी निवेदनात लिहिले आहे.
दि,२७ जानेवारी २०२६ रोजी त्यांची १०० वी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने शिवसेनाप्रमुखांना अनोखी श्रद्धांजली द्यावी, ही देशभरातील लाखो चाहत्यांची इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र सरकारने विशेष टपाल तिकीट जारी करून यथोचित सन्मान करावा, अशी मागणी शेवाळे यांनी निवेदनातून केली आहे.