ध्रुव गोयल यांचे भाषण ऐकण्याची केली सक्ती, कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालयातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 06:19 AM2024-03-24T06:19:15+5:302024-03-24T06:19:32+5:30

कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असताना त्यांना ध्रुव गोयल यांच्या भाषणासाठी बसविण्यात आले.

Forced to listen to Dhruv Goyal's speech, type in Kandivali's Thakur College | ध्रुव गोयल यांचे भाषण ऐकण्याची केली सक्ती, कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालयातील प्रकार

ध्रुव गोयल यांचे भाषण ऐकण्याची केली सक्ती, कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालयातील प्रकार

मुंबई : कांदिवलीच्या ठाकूर कॉलेजमध्ये केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पीयूष गोयल यांचे सुपुत्र ध्रुव यांच्या भाषणासाठी कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांना सक्तीने बसवल्याची तक्रार करण्यात आल्याने नवीन वाद सुरू झाला आहे. 
कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असताना त्यांना ध्रुव गोयल यांच्या भाषणासाठी बसविण्यात आले.

विद्यार्थी भाषण सोडून जाऊ नयेत म्हणून त्यांच्याकडील आयकार्ड काढून घेण्यात आले. अशी सक्ती करून तुमचे भाषण ऐकायला लावण्याचा हा प्रकार लोकशाही बळकट करणारा आहे का, असा सडेतोड सवाल या कार्यक्रमात एका विद्यार्थ्याने केला. त्याच्या या प्रश्नावर उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून पाठिंबा दर्शवला. या विद्यार्थ्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.

ध्रुव गोयल या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतःचे निर्णय स्वतः घ्या, आपल्या आई-वडिलांच्या प्रभावाखाली मतदान करू नका, आपला आतला आवाज ऐका, असे आवाहन विद्यार्थ्यांना करताना दिसत आहेत. याप्रकरणी कॉलेजची बाजू जाणून घेण्यासाठी कॉलेजच्या प्राचार्य चैताली चक्रवर्ती यांच्याशी वारंवार संपर्क करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

... तर परदेशी मान कसा मिळणार?
आमचे कॉलेजच आमच्याशी असे गैरवर्तन करत असेल तर परदेशातील लोकांनी आम्हाला मानाने वागवावे, अशी आपण कशी बाळगू शकतो, असा परखड सवाल विद्यार्थ्यांनी केला.

या आधीही असा प्रकार
भाजप मुंबईतील महाविद्यालयांमध्ये चोर मार्गाने आपल्या उमेदवारांचा प्रचार करत असल्याचा आरोप शिवसेनाप्रणित (उबाठा) युवा सेनेचे नेते आणि माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केला. यापूर्वी मतदार नोंदणीच्या नावाखाली दादरच्या कीर्ती महाविद्यालयात असाच प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावेळी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे या प्रकाराची तक्रार करण्यात आली. परंतु, त्याची दखल घेतली गेली नाही. या गोष्टीची पुनरावृत्ती झाली. याबाबत आम्ही महाविद्यालयाला आणि विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारणार आहोत, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

Web Title: Forced to listen to Dhruv Goyal's speech, type in Kandivali's Thakur College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.