तरंगत्या कचऱ्याची लावली जाणार विल्हेवाट..! पूर्व उपनगरासाठी पालिकेचे पुढील ५ वर्षांसाठी नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 10:09 AM2024-03-16T10:09:15+5:302024-03-16T10:09:39+5:30

मुंबईतील नदी, नाल्यांमध्ये तरंगणारा कचरा हटवून पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यासाठी पालिकेकडून ‘ट्रॅश बूम’सह तराफ्याचा वापर करण्यात येतो.

floating waste will be disposed in mumbai municipal planning for the eastern suburbs for the next 5 years | तरंगत्या कचऱ्याची लावली जाणार विल्हेवाट..! पूर्व उपनगरासाठी पालिकेचे पुढील ५ वर्षांसाठी नियोजन

तरंगत्या कचऱ्याची लावली जाणार विल्हेवाट..! पूर्व उपनगरासाठी पालिकेचे पुढील ५ वर्षांसाठी नियोजन

मुंबई :मुंबईतील नदी, नाल्यांमध्ये तरंगणारा कचरा हटवून पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यासाठी पालिकेकडून ‘ट्रॅश बूम’सह तराफ्याचा वापर करण्यात येतो. मुंबईत सध्या अशी यंत्रणा नऊ ठिकाणी आहे.  पावसाळ्यापूर्वी पूर्व उपनगरात ही यंत्रणा वापरली जाणार आहे. पुढच्या ५ वर्षांसाठी ही यंत्रणा वापरण्याचे नियोजन पालिकेकडून करण्यात आले आहे. 

तरंगणारा कचरा ही मुंबई पालिकेसमोरील न सुटणारी समस्या आहे. भरतीच्या वेळी समुद्रातून कचरा नाल्यांमध्ये येतो, तर नाल्यांमधील कचराही वाहत समुद्राला जाऊन मिळतो.

मुंबईच्या विविध परिसरातील आणखी १६ ठिकाणी ही यंत्रणा कार्यरत केली जाणार आहे. मुख्य म्हणजे मिठी नदीतही ‘ट्रॅश बूम’ची संख्या वाढवण्यात येणार असून पुढच्या काही आठवड्यात या यंत्रणेसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. पावसाळ्याआधीच निविदा पूर्ण करून ‘ट्रॅश बूम’ टप्प्याटप्प्याने पालिकेच्या ताफ्यात दाखल होतील. त्यामुळे पुढील पावसाळ्यासाठीच याचा फायदा होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

सध्या यंत्रणा कार्यरत -

पूर्व उपनगरातील नाल्यांमध्ये सध्या पावसाळ्यात दोन पाळ्यांमध्ये नाल्यातील तरंगता कचरा काढण्यासाठी ‘ट्रॅश बूम’चा वापर केला जातो. तर अन्य दिवसांत एका पाळीतच या यंत्रणेचा वापर केला जातो. या मशीनद्वारे पावसाळ्यादरम्यान १६ तासांपर्यंत काम करता येऊ शकते, तर अन्य दिवशी आठ तास काम केले जात असल्याचे सांगण्यात आले.

मिठी नदीमध्ये ३ ‘ट्रॅश बूम’-

१)  पश्चिम उपनगरातील सहा ठिकाणी आणि मिठी नदीमध्ये तीन हे ‘ट्रॅश बूम’ तरंगता कचरा काढण्यासाठी ठेवले आहेत. तराफ्याच्या जाळीत हा कचरा अडकतो आणि तो ‘ट्रॅश बूम’द्वारे काढला जातो. 

२)  हा कचरा समुद्रात जाण्यापासून रोखण्यासाठी हरित लवाद, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व न्यायालयानेही पालिकेस आवश्यक उपाय करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे समुद्रात वाहून जाणारा तरंगता कचरा रोखण्यासाठी पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या माहितीनुसार शहर आणि उपनगरांतील मोठे नाले, छोटे नाले, मिठी नदी यांची लांबी  सुमारे ६८९ किमी आहे. त्यातील मोठ्या नाल्यांची लांबी सुमारे २४८ किमी असून छोट्या नाल्यांची लांबी सुमारे ४२१ किमी आहे. याशिवाय मिठी नदीची लांबी २० किमी आहे. यात काठावरील वस्त्या, घरातून कचरा नाल्यांमध्ये टाकला जातो.

नाल्यात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यात प्लास्टिक, गाद्यांसह भंगारातील अन्य वस्तूंचा समावेश असतो; मात्र तरंगत्या कचऱ्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा येतो. हा कचरा काढण्यासाठी व तो समुद्रात जाऊ नये, यासाठी पालिकेने काही वर्षांपूर्वी ‘ट्रॅश बूम’सह तराफा घेतले आणि त्याचा वापर नदी, नाल्यांमध्ये सुरू केला. या यंत्रणेचा फायदा लक्षात घेता पूर्व उपनगरातील नाल्यांसाठी ही यंत्रणा कार्यरत करण्यात येणार आहे.

Web Title: floating waste will be disposed in mumbai municipal planning for the eastern suburbs for the next 5 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.