Join us
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत पाच वर्षीय चिमुरडीवर शेजाऱ्याकडून बलात्कार; विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 16:35 IST

गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

भिवंडी: भिवंडीमध्ये एका 20 वर्षीय नराधमाने 5 वर्षीच चिमुकलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पीडितेच्या शेजारीच राहणाऱ्या एका 20 वर्षीय नराधमाने चिमुरडीवर बलात्कार केला. याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात बलात्कारासह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी फरार झाला असून पोलिसांनी आरोपी नराधमाचा शोध सुरु केला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, पीडित चिमुरडी कुटूंबासह शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका चाळीत राहते. आरोपी नराधमही तिच्या शेजारीच राहत असून तो एका लूममध्ये कामगार म्हणून काम करतो. रविवारी सकाळच्या सुमारास पीडित चिमुरडी घरासमोरील अंगणात खेळत होती. त्यावेळी तिला बहाण्याने घरात बोलवून आरोपीने दरवाजा बंद करुन तिच्यावर बलात्कार केला. काही वेळाने पीडित अल्पवयीन मुलगी घरी आल्यानंतर आईला अंघोळ घालण्यासाठी तिने सांगितले असता अंघोळ घालत असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला. 

चिमुरडीवर झालेला प्रकार उघडकीस येताच पीडितेच्या आईने शांतीनगर पोलिस ठाणे गाठून पीडितेवरील घडलेला प्रसंग सांगितला. तसेच, शेजारी राहणाऱ्या 20 वर्षीय नराधमावर भादंवि 376(अ)(ब), 342, 201 या कलमांसह पोक्सो कायदा कलम 4 आणि 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी नराधम फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास महिला अधिकारी सुप्रिया जाधव करत आहेत. 

टॅग्स :पॉक्सो कायदामुंबईगुन्हेगारीपोलिस