The first week of electricity purchase is full of 'best' | वीज खरेदीचा पहिला हफ्ता ‘बेस्ट’ने भरला
वीज खरेदीचा पहिला हफ्ता ‘बेस्ट’ने भरला

मुंबई : टाटा वीज कंपनीकडून मिळालेल्या वाढीव मुदतीप्रमाणे बेस्ट प्रशासनाने थकीत रकमेचा पहिला हफ्ता भरला आहे. त्यामुळे शहर भागातील बत्ती गुल होण्याचे संकट टळले आहे. थकीत ५६१.५८ कोटींपैकी पहिल्या हफ्त्यापोटी १२५ कोटी बेस्टने जमा केले आहेत.
टाटा कंपनीकडून वीज खरेदी करून बेस्ट उपक्रम त्याचे वितरण शहर भागात करीत असते. परंतु आर्थिक संकटामुळे डिसेंबर २०१८ पासून एप्रिल २०१९ पर्यंत टाटाचे बिल बेस्ट प्रशासनाने भरले नाही. यामुळे टाटा कंपनीने १४ मे रोजी नोटीस पाठवून आठ दिवसांमध्ये थकीत रक्कम न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला होता. मात्र पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी वेळीच हस्तक्षेप करून टाटा कंपनीकडून मुदत वाढवून घेतली. यामुळे बेस्ट उपक्रमाला पहिल्या हफ्त्यासाठी रकमेची तजवीज करण्यास अवधी भेटला. तसेच शहर भागातील १० लाख ग्राहकांवरील अंधाराचे संकट टळले.
नुकतीच महापालिकेने दरमहा १०० कोटी रुपये देण्याची तयारी दाखविल्यामुळे बेस्ट प्रशासनाला बळ मिळाले आहे. त्यामुळे वीज खरेदीची थकीत रक्कम तीन महिन्यांत टप्प्याटप्प्याने भरण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. १२५ कोटींचा पहिला हफ्ता दिल्यामुळे आता उर्वरित दोन टप्प्यांमध्ये ४३६ कोटी रुपये बेस्ट प्रशासनाला टाटा कंपनीकडे जमा करावे लागणार आहेत. मात्र एवढी मोठी रक्कम उभी करणे बेस्ट प्रशासनासाठी आव्हान ठरणार आहे.


Web Title: The first week of electricity purchase is full of 'best'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.