For the first time in Mumbai, the number of patients doubling over a century has passed | मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीचे पहिल्यांदाच शतक पार

मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीचे पहिल्यांदाच शतक पार


माझे कुटुंब, माझी जबाबदारी, चेज द व्हायरस सारख्या सर्वस्तरीय प्रयत्नांना नागरिकांची साथ

मुंबई : 'चेज द व्हायरस', मिशन झिरो, ट्रेसिंग – ट्रॅकींग – टेस्टींग – ट्रिटिंग (4 T) या चतु:सूत्रीनुसार अविरतपणे करण्यात येत असलेली कार्यवाही; 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेंतर्गत अव्याहतपणे सुरु असलेल्या गृहभेटी, बहुस्तरीय पद्धतीने सातत्याने करण्यात येत असलेली नागरिकांची पडताळणी, मुंबई पोलीसांच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंध विषयक बाबी; अशा बृहन्मुंबई महापालिकेद्वारे प्रभावीपणे राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आणि महापालिकेद्वारे घेण्यात येत असलेल्या अविश्रांत प्रयत्नांना नागरिकांची मोलाची साथ मिळत असल्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत.

काही दिवसांपूर्वी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने अर्धशतक पार केले होते. आता याच श्रृंखलेत रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने पहिल्यांदाच तब्बल १०२ दिवसांचा टप्पा गाठत आज 'शतक' पार केले आहे. यानिमित्ताने महापालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांनी महापालिका प्रशासनाच्या अव्याहत प्रयत्नांना मोलाची साथ देणा-या मुंबईकरांचे आभार मानत मा. लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनामुळे आणि मुंबईकरांच्या सहकार्यामुळेच कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांना बळ मिळत असल्याचे आवर्जून नमूद केले आहे. त्याचबरोबर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात 'मिशन झिरो' हे आपले ध्येय असून ते गाठण्यासाठी सर्वांनीच आपापल्या स्तरावर अधिक प्रभावीपणे अथक प्रयत्न करायचे आहेत, असेही महापालिका आयुक्तांनी आवर्जून नमूद केले आहेत.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा २५ ऑगस्ट २०२० रोजी ९३ दिवस इतका झाला होता. तथापि, त्यानंतर संसर्गाचे प्रमाण वाढल्याने हा कालावधी काही प्रमाणात कमी होत १४ सप्टेंबर २०२० रोजी ५४ दिवस इतका नोंदविण्यात आला होता. त्यानंतर बृहन्मुंबई महापालिकेने केलेली अधिक प्रभावी सर्वस्तरीय प्रतिबंधात्मक उपाययोजना, प्रभावीपणे राबविलेली 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम आणि सातत्याने साधलेली प्रभावी जनजागृती यामुळे या कालावधीत पुन्हा एकदा सकारात्मक वाढ नोंदविण्यात येऊन रुग्ण दुपटीचा कालावधी १ ऑक्टोबर रोजी ६६ दिवस, १० ऑक्टोबर रोजी ६९ दिवस आणि आजच्या २१ ऑक्टोबर रोजी १०२ दिवस एवढा नोंदविण्यात आला आहे. यात विशेष नोंद घ्यावी अशी बाब म्हणजे १० ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर या साधारणपणे १० दिवसांच्या कालावधीत रुग्ण दुपटीचा कालावधी हा ६९ दिवसांवरुन ३१ दिवसांनी वाढून तो १०२ दिवस इतका झाला आहे.

वरीलबाबत महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांचा स्वतंत्रपणे विचार केल्यास २४ पैकी ३ विभागात रुग्ण दुपटीचा कालावधी हा १५० दिवसांपेक्षा अधिक आहे, तर या व्यतिरिक्त ११ विभागांमध्ये सदर कालावधी १०० दिवसांपेक्षा अधिक आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी हा १५० दिवसांपेक्षा अधिक असणा-या ३ विभागांमध्ये 'जी दक्षिण विभागातील रुग्ण दुपटीचा कालावधी हा सर्वाधिक असून तो १७५ दिवस इतका आहे. तर या खालोखाल 'इ' विभागात १६० दिवस, आणि एफ दक्षिण विभागात १५७ दिवस इतका आहे.

तसेच वरील ३ विभागांव्यतिरिक्त इतर ११ विभागांमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी हा १०० दिवसांपेक्षा अधिक आहे. या ११ विभागांमध्ये 'बी' विभागात १३७ दिवस, 'जी उत्तर' विभागात १३६ दिवस आणि 'एम पूर्व' व 'ए' विभागात १३५ दिवस इतका रुग्ण दुपटीचा कालावधी आहे.

रुग्ण दुपटीचा कालावधी म्हणजे नक्की काय?

'कोरोना कोविड – १९' या आजाराच्या संसर्गाचे विश्लेषण करताना त्यात रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. रुग्ण दुप्पट होण्याचे दिवस म्हणजेच कालावधी जेवढा अधिक तेवढी सदर बाब अधिक सकारात्मक असते. सध्या बृहन्मुंबई महापालिका क्षेत्राचा रुग्ण दुपटीचा कालावधी हा आता सरासरी १०२ दिवस इतका झाला आहे. याचाच अर्थ सांख्यिकीय गणनेनुसार बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्ण संख्या दुप्पट होण्यास सध्या १०२ दिवसांचा कालावधी लागतोय. हा आकडा जेवढा अधिक किंवा मोठा असेल, तेवढी ती बाब आपल्यासाठी सकारात्मक असते. ही आकडेवारी एका आठवड्याच्या म्हणजेच ७ दिवसांच्या कालावधीच्या आकडेवारीचे केलेले सांख्यिकीय विश्लेषण असते.


बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्ण दुप्पट होण्याच्या दिवसांमध्ये सकारात्मक वाढ सातत्याने नोंदविली जात आहे. २२ मार्च २०२० रोजी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा केवळ ३ दिवस होता. याचाच अर्थ २२ मार्च रोजी रुग्णांची असणारी संख्या तीन दिवसात दुप्पट होत होती. त्यानंतर १५ एप्रिल २०२० रोजी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५ दिवस एवढा नोंदविण्यात आला. दि. १२ मे २०२० रोजी हाच कालावधी अधिक सकारात्मक होत तो १० दिवसांवर पोहचला. २ जून २०२० रोजी रुग्ण दुपटीचा कालावधी २० दिवसांवर; आणि १६ जून रोजी ३० दिवस एवढा नोंदविण्यात आला. २४ जून रोजी ४१ दिवस आणि दि. १० जुलै २०२० रोजी हा कालावधी ५० दिवसांवर आणि २५ ऑगस्ट रोजी ९३ दिवसांवर पोहचला होता. मात्र, त्यानंतर संसर्गाचे प्रमाण वाढल्याने हा कालावधी १४ सप्टेंबर रोजी ५४ दिवसांपर्यंत नोंदविण्यात आला होता. त्यानंतर २१ सप्टेंबर रोजी ६० दिवस, १ ऑक्टोबर रोजी ६६ दिवस, १० ऑक्टोबर रोजी ६९ दिवस असा नोंदविण्यात आलेला हा कालावधी आज तब्बल १०२ दिवसांवर पोहचला आहे. यामुळे बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्णांचा कालावधी दुप्पट होण्याच्या कालावधीने शतकपूर्ती केली आहे. ही बाब सर्वच मुंबईकरांना निश्चितपणे दिलासा देणारी आहे.

रुग्णसंख्येतील दैनंदिन सरासरी टक्केवारीच्या वाढीत सातत्याने घट

‘कोविड कोरोना १९' या संसर्गजन्य आजाराच्या प्रसाराचे विश्लेषण करताना रुग्ण दुपटीच्या कालावधीसोबतच आणखी एक महत्त्वाची आकडेवारी लक्षात घेणे गरजेचे असते. ती आकडेवारी म्हणजे रुग्णांच्या संख्येत दैनंदिन वाढ होण्याची सरासरी टक्केवारी. रुग्णांची संख्या दुप्पट होण्यास लागणारा कालावधी आणि रुग्ण संख्येत दैनंदिन वाढ होण्यास लागणारा कालावधी यातील महत्त्वाचा फरक म्हणजे रुग्ण दुपटीचा कालावधी जेवढा अधिक तेवढा तो सकारात्मक; तर त्याचवेळी रुग्ण वाढ होण्याची दैनंदिन सरासरी टक्केवारी जेवढी कमी तेवढी परिस्थिती चांगली असल्याचे निदर्शक असते. रुग्ण संख्येत होणारी दैनंदिन वाढ ही जेवढी कमी, तेवढी ती बाब सकारात्मक असल्याचे मानले जाते. रुग्ण संख्येत होणारी वाढ ही आधल्या दिवशी असणारी रुग्णांची संख्या आणि त्याच्या दुस-या दिवशीची रुग्णसंख्या यातील फरकाचे संख्याशास्त्रीय विश्लेषण असते.

याच अनुषंगाने कोविड प्रतिबंधासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्वंकष व सर्वस्तरीय प्रयत्नांना यश येत असल्याचे नुकत्याच उपलब्ध झालेल्या रुग्ण संख्येच्या दैनंदिन आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. यानुसार रुग्ण संख्येत होणा-या दैनंदिन वाढीची सरासरी टक्केवारी ही दिवसेंदिवस कमी होत असून, गेल्या महिन्यात २१ सप्टेंबर रोजी रोजी १.२२ टक्के असणारी ही आकडेवारी, आता एका महिन्यानंतर ०.६९ टक्क्यांवर आली आहे. एकीकडे रुग्ण दुपटीच्या कालावधीत सकारात्मक वाढ नोंदविली जात असतानाच, रुग्ण वाढीच्या दैनंदिन सरासरी टक्केवारीतही दररोज सकारात्मक घट नोंदविली जात आहे. या दोन्ही बाबी मुंबईकरांसाठी निश्चितच दिलासादायक आहेत.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्णांची वाढ होण्याच्या प्रती १०० रुग्णांमागील दर हा जेवढा कमी असेल तेवढे सकारात्मक व चांगले असल्याचे द्योतक आहे. दि. २१ सप्टेंबर २०२० रोजी हा दर सरासरी १.२२ टक्के एवढा होता. या दरात आता 'सकारात्मक घट' नोंदविण्यात आली असून हा दर आता सरासरी ०.६९ टक्के एवढा झाला आहे. तर विभागस्तरीय आकडेवारीचा विचार केल्यास सर्वात कमी दर हा 'जी दक्षिण' विभागामध्ये ०.४० टक्के एवढा नोदविण्यात आला आहे. या खालोखाल 'इ' विभागात ०.४३ टक्के आणि 'एफ दक्षिण' विभागात ०.४४ टक्के एवढा नोदविण्यात आला आहे. सर्व २४ विभागांपैकी १३ विभागांमधील सरासरी दैनंदिन रुग्णवाढीचा एकूण सरासरी पेक्षा अर्थात ०.६९ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

मुंबईकर आणि बृहन्मुंबई महापालिका कसा करत आहेत कोविडचा मुकाबला

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात ११ मार्च २०२० रोजी कोविडचा पहिला रुग्ण आढळून आला होता. 'संसर्गजन्यता'ही तुलनेने अधिक असणा-या या आजाराला प्रतिबंध करणे, हे लोकसंख्येची घनता अधिक असणा-या बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रासारख्या परिसरापुढे मोठे आव्हानच होते व आहे. तथापि, या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाद्वारे सर्वस्तरीय प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देतानाच वैदयकीय उपचार विषयक आवश्यक ती कार्यवाही देखील सातत्यपूर्ण पद्धतीने केली जात आहे. परिणामी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोना संसर्गास परिणामकारकरित्या आळा घालणे शक्य होत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरुन दिसून येत आहे.

'चेज द वायरस आणि 'ट्रेसिंग – ट्रॅकींग – टेस्टींग – ट्रिटिंग' ची चतु:सूत्री

महापालिका आयुक्त श्री इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात बृहन्मुंबई महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने विविध स्तरीय उपायोजना अव्याहतपणे राबविण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने 'चेज द वायरस' आणि 'ट्रेसिंग – ट्रॅकींग – टेस्टींग – ट्रिटिंग' ची चतु:सूत्री या उपाययोजनांचा समावेश आहे. याअंतर्गत बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा अत्यंत प्रभावीपणे शोध घेत संबंधित व्यक्तींचे अलगीकरण करणे, आवश्यकतेनुरुप संशयितांच्या व बाधितांच्या कोरोना विषयक वैद्यकीय चाचण्या करणे आणि लक्षणे असलेल्या बाधितांवर सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार औषधोपचार करणे यासारख्या बाबींचा समावेश आहे. वैद्यकीय चाचण्या करताना त्याबाबतचा अहवाल २४ तासांच्या आत महापालिकेकडे प्राप्त होईल आणि त्यानंतर महापालिकेच्या स्तरावर सुनिश्चित कार्यपद्धती (Standard Operating Procedure / SOP) नुसार अधिकाधिक प्रभावी कार्यवाही करण्यात येत आहे. सुनिश्चित कार्यपद्धतीची काटेकोरपणे अंमलबजावणी नियमितपणे करण्यात येत आहे. अभियान पद्धतीने करण्यात येत असलेल्या या कार्यवाहीमुळे बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचा प्रभावीपणे शोध घेऊन त्यांचे विलगीकरण व आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्याची कार्यवाही सातत्याने केली जात आहे.

मिशन झिरो आणि शीघ्रकृती कार्यक्रम (Rapid Action Plan)

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात 'कोरोना कोविड १९' ची रुग्ण संख्या शुन्यावर आणणे आणि यासाठी शीघ्रकृती कार्यक्रमाची कणखरपणे व अभियान स्वरुपात अंमलबजावणी करण्याचा कार्यक्रम बृहन्मुंबई महापालिकेने हाती घेतला आहे. महानगरपालिकेच्या या प्रयत्नांना लोकप्रतिनिधी, जनसामान्य यांच्यासह सामाजिक संस्थाचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे. ‘कोरोना कोविड १९ विषाणू विरुद्धच्या युद्धामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपाययोजनांना यश येत असून मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा सरासरी कालावधी आता १०२ दिवसांवर गेला आहे. मात्र, असे असले तरी ज्या भागांमधील रुग्ण दुप्पटीचा कालावधी सरासरीपेक्षा कमी असेल, त्या विभागांमध्ये शीघ्रकृती कार्यक्रम (Rapid Action Plan) नियमितपणे राबविण्यात येत आहे. या अंतर्गत प्रामुख्याने फिरते दवाखाने (मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन) विविध परिसरांमध्ये जाऊन प्राथमिक तपासणी व चाचणी करुन बाधितांचा शोध घेत आहेत. गरज असणा-या भागांमध्ये २ ते ३ आठवडे मिशन मोडमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम

`बृहन्मुंबई 'कोविड १९' या संसर्गजन्य आजाराला प्रतिबंध करण्यासह प्राथमिक आरोग्य तपासणी करणे, आरोग्य शिक्षण देणे आणि कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर २०२० या कालावधीत संपूर्ण राज्यभरात 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनात प्रभावीपणे राबविली जात आहे. या अंतर्गत घरोघर जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षणादरम्यान कुटुंबातील सदस्यांची प्राणवायू पातळी व शारीरिक तापमान तपासण्याचा समावेश असून प्रत्येक कुटुंबाच्या स्तरावर आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यात येत आहे. त्याचबरोबर ज्या नागरिकांना सहव्याधी (Co-morbidity) असतील, त्यांची स्वतंत्र नोंद घेतली जात आहे, तर ज्या नागरिकांना कोविडची लक्षणे असतील, त्यांना महापालिकेच्या दवाखान्यात अथवा रुग्णालयात पुढील आवश्यक त्या तपासणीसाठी संदर्भित केले जात आहे.

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने आणि महापालिका आयुक्त श्री इक्बाल सिंह चहल यांच्या नेतृत्वात राबवीली जात आहे. तर अतिरिक्त महापालिका आयुक्त श्री. सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनात या मोहिमेचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अंतर्गत घरोघर जाऊन सर्वेक्षण करण्याच्या कामाचे समन्वयन हे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे करण्यात येत आहे.

मुंबई पोलिसांच्या सहकार्याने सुनियोजित अंमलबजावणी

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक परिसरात जे नागरिक 'विना मास्क' आढळून येतील त्यांच्यावर महापालिकेच्या पथकांद्वारे दंडात्मक कारवाई नियमिपणे केली जात आहे. ही कारवाई आवश्यक तेथे मुंबई पोलिसांच्या सहकार्याने देखील नियमितपणे केली जात आहे. यामुळे देखील कोविड संसर्गास आळा घालणे महापालिकेला शक्य होत आहे. त्याचबरोबर जे परिसर 'कंटेनमेंट झोन' म्हणून घोषित करण्यात आले, त्याठिकाणी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये परिसरातील नागरिकांच्या स्तरावर नियमितपणे जाणीवजागृती करणे, नागरिकांना यांच्या परिसरात बाहेर पडण्याची गरज भासू नये यासाठी यथायोग्य सर्व दक्षता घेण्यासही जीवनावश्यक बाबींची उपलब्धता त्याच परिसरात करून देण्याबाबतची कार्यवाही करणे इत्यादी बाबींची परिणामकारक अंमलबजावणी सातत्याने करण्यात येत आहे. या कार्यवाहीसाठी देखील मुंबई पोलिसांचे मोलाचे सहकार्य महापालिकेला मिळत आहे.

सार्वजनिक शौचालयांचे सातत्याने निर्जंतुकीकरण

झोपडपट्टी परिसरांसह इतर परिसरात असणाऱ्या सार्वजनिक शौचालयांचा होत असलेला वापर आणि त्यामुळे संसर्गाची संभाव्यता लक्षात घेत महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक शौचालयांचे सातत्याने निर्जंतुकीकरण दिवसातून अनेकदा करण्यात येत आहे. त्याचबरोबर सार्वजनिक शौचालयांमध्ये साबण, सॅनिटायझर यासारख्या बाबी यथायोग्य प्रमाणात उपलब्ध असतील याकडेही काळजीपूर्वक लक्ष पुरविण्यात येत आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: For the first time in Mumbai, the number of patients doubling over a century has passed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.