चाकणकरांनंतर आता भांडे-पाटलांचा नंबर; भोंदू खरात प्रकरणात पहिल्या अधिकाऱ्यावर कारवाई; 'SRA' तून उचलबांगडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 09:35 IST2026-03-25T09:31:36+5:302026-03-25T09:35:00+5:30
अशोक खरातशी असलेल्या संबंधावरुन बड्या उपजिल्हाधिकाऱ्याची गच्छंती करण्यात आली आहे.

चाकणकरांनंतर आता भांडे-पाटलांचा नंबर; भोंदू खरात प्रकरणात पहिल्या अधिकाऱ्यावर कारवाई; 'SRA' तून उचलबांगडी
Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या लैंगिक शोषणाचे आणि अफाट मालमत्तेचे काळे कारनामे उघड झाल्यानंतर आता राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे. खरातच्या आर्थिक व्यवहारांमध्ये नाव अडकलेले मुंबईतील उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे-पाटील यांची सरकारने तडकाफडकी बदली केली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना आता मंत्रालयातील महसूल व वन विभागात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पत्नीची भागीदारी अन भांडे-पाटलांची खुर्ची धोक्यात!
अशोक खरातची २४ वर्षीय मुलगी तृप्तबाला हिच्यासोबत उपजिल्हाधिकारी भांडे-पाटील यांच्या पत्नी प्रिती भांडे-पाटील यांनी पाथर्डी येथील एका मोठ्या जमीन व्यवहारात भागीदारी केली होती. २०२२ मध्ये झालेल्या या व्यवहाराचे धागेदोरे आता खरातच्या अटकेनंतर समोर आले. फक्त जमीनच नव्हे, तर रिअल इस्टेट फर्म्स आणि स्टार्टअप्समध्येही या दोन्ही कुटुंबांचे व्यावसायिक हितसंबंध असल्याचे उघड झाले असून, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे.
मंत्रालयात बदली
गेल्या चार वर्षांपासून मुंबईत एसआरए सारख्या महत्त्वाच्या विभागात असलेल्या भांडे-पाटलांना साईड पोस्टिंग मिळेल अशी चर्चा होती. मात्र, सरकारने त्यांना थेट मंत्रालयातील महसूल विभागात पाठवले आहे. विरोधकांनी यावर टीकेची झोड उठवली असून, हा डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. भोंदूबाबाच्या मुलीसोबत भागीदारी करणाऱ्या अधिकाऱ्याला इतक्या महत्त्वाच्या खात्यात स्थान का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
देवेंद्र फडणवीसांनी वाचला खरातच्या संपत्तीचा पाढा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अशोक खरातच्या संपत्तीची जी यादी वाचली, ती ऐकून संपूर्ण सभागृह थक्क झाले. त्याच्याजवळ अंदाजे ४० कोटी ८७ लाख रुपयांचे बाजारमूल्य असलेली मालमत्ता असल्याचे समोर आलं. यामध्ये मिरगाव (३३ एकर), पाथर्डी (१० एकर), सिन्नर (६ एकर) आणि शिर्डी विमानतळाजवळ ५.५ एकर जमीन आहे. खरातकडे नाशिकमध्ये कर्मयोगी नगर बंगला, फार्महाऊस, आणि शिर्डीतील साई सिल्व्हर ओक मंगल कार्यालय असून
मुलीच्या नावे पुणे व संगमनेरमध्ये भूखंड, ३२ तोळे सोने आणि विविध बँकांमधील खाती असल्याची माहिती समोर आली आहे.
राजकीय बळी आणि प्रशासकीय धाबे दणाणले
अशोक खरात प्रकरणामुळे केवळ अधिकारीच नव्हे, तर राजकीय नेतेही गोत्यात आले आहेत. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. खरातच्या ट्रस्टमध्ये संचालिका असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून आता त्यांचीही चौकशी होणार आहे.