कुर्ला, घाटकाेपर, आसनगावमध्ये अग्नितांडव; कारखाना बेचिराख; कामगार बचावले, आग शमविण्यासाठी २२ टँकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:48 IST2025-10-14T15:47:42+5:302025-10-14T15:48:25+5:30
अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ आग शमविण्याचे काम सुरू केले. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

कुर्ला, घाटकाेपर, आसनगावमध्ये अग्नितांडव; कारखाना बेचिराख; कामगार बचावले, आग शमविण्यासाठी २२ टँकर
भातसानगर : आसनगाव औद्योगिक परिसरातील आदर्शनगर येथील एस.के.आय. प्लास्ट या प्लास्टिकच्या वस्तू बनविणाऱ्या कंपनीला सोमवारी सकाळी १० च्या सुमारास अचानक भीषण आग लागली. धुराचे लोळ येऊ लागल्याने कामगारांनी प्रसंगावधान राखत कंपनीबाहेर धाव घेतल्याने कुठलाही जीवितहानी झाली नाही.
आगीची माहिती प्राप्त होताच शहापूर नगरपंचायत, जिंदाल कंपनी, कल्याण-डोंबिवली व भिवंडी महापालिका अग्निशमन दलाचे दोन बंब व स्थानिक २२ पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ आग शमविण्याचे काम सुरू केले. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते.
‘त्या’ आठवणीला उजाळा
प्लास्टिक कंपनी १८ वर्षांपासून कार्यरत आहे. तहसीलदार परमेश्वर कासुळे, पोलिस निरीक्षक मुकेश ढगे, नायब तहसीलदार वसंत चौधरी यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. दोन वर्षांपूर्वी वेहलोळी येथील प्लास्टिक कंपनीला आग लागली हाेती. यात कंपनी भस्मसात झाली होती.
कंपनीला आग लागली हे समजतात तातडीने पाण्याचे टँकर मागविले. ही आग इतरत्र पसरू नये याची काळजी घेतली.
राहुल चंदे, उपसरपंच, आसनगाव
एमआरआय सेंटरला आग, टेरेसवर धाव घेतल्याने २५० जण बचावले -
मुंबई : पूर्व उपनगरातील घाटकोपर
(पश्चिम), एलबीएस रोड येथे गोल्डन क्रश बिझनेस पार्क या तळमजला अधिक ९ मजली इमारतीत सोमवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याचे कळताच कार्यालयीन कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. तब्बल २५० जणांनी थेट टेरेसवर धाव घेतल्याने ते थोडक्यात बचावले.
या आगीत अग्निशमन दलाचे जवान वैभव राणे प्रचंड धुरामुळे गुदमरले. त्यांना तत्काळ नजीकच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सायंकाळी आग विझवली
इमारतीच्या तळमजल्याला असलेल्या ‘निवारण’ एमआरआय सेंटरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. त्यावेळी काही रुग्ण एमआयआर काढण्यासाठी तेथे आले होते. मात्र, आग लागल्याने त्यांचीही तारांबळ उडाली.
आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या मोठी होती. अनेकजण दुपारच्या जेवणासाठी इमारतीबाहेर पडले. लोकांनी थेट इमारतीच्या टेरेसवर धाव घेतली. अखेर सायंकाळी ५:५० वाजताच्या दरम्यान अग्निशमन दलाने आग विझविली.
ऑटोमोबाइल्सचे २० गाळे खाक; मध्यरात्री आगडोंब -
मुंबई : रविवारी रात्री उशिरा कुर्ला पश्चिमेला सीएसटी रोडवर ऑटोमोबाइल्सच्या सुट्या भागांचा साठा असलेल्या गाळ्याला आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे आजूबाजूचे २० गाळेही खाक झाले. यात कोणीही जखमी नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून देण्यात आली.
कुर्ला पश्चिम, सीएसटी रोड, कपाडिया नगर, गुरुद्वारा येथे ऑटोमोबाइल्सचे सुटे भाग, टायर, इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, स्क्रॅप मटेरियल आणि इतर साहित्य आदींचा साठा असलेले अंदाजे ३००० चौरस फूट क्षेत्रफळाचे बैठे, एकमजली गाळे आहेत. या ठिकाणी आगीच्या सुरक्षेबाबत दक्षता घेतली आहे का? याचा तपास सुरू करण्यात
आला आहे.
मोठ्या प्रमाणात वित्तीय हानी
एका गाळ्याला मध्यरात्री २:३० वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आग भडकल्याने १५ ते २० गाळ्यांमध्ये पसरली. आगीत मोठ्या प्रमाणात वित्तीय हानी झाली. आगीची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी युद्धपातळीवर आग शमविण्यास सुरुवात केली. आगीचे वृत्त कळताच गाळेधारक, मालकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नाअंती ४ फायर इंजिन, १० जंबो वॉटर टँकरच्या साहाय्याने पाच तासांनी नियंत्रण मिळविले.