ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 05:32 IST2025-04-28T05:32:31+5:302025-04-28T05:32:57+5:30
बॅलार्ड इस्टेट परिसरातील कैसर-ए-हिंद या पाच मजली इमारतीत ईडीचे कार्यालय आहे. रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने धाव घेतली.

ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
मुंबई : महत्त्वाच्या अनेक प्रकरणांचा तपास करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) दक्षिण मुंबईतील कार्यालयात रविवारी पहाटे आग लागल्याने खळबळ उडाली. आग नेमकी कशी लागली? किती नुकसान झाले? कागदपत्रे जळाली का? नेमकी कोणती कागदपत्रे जळाली? आदी प्रश्नांचे गूढ कायम आहे. त्याचा तपास सुरू झाला असला तरी या आगीतून संशयाचा धूर पसरू लागला आहे.
बॅलार्ड इस्टेट परिसरातील कैसर-ए-हिंद या पाच मजली इमारतीत ईडीचे कार्यालय आहे. रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने धाव घेतली. तोवर चौथ्या मजल्यापर्यंत आगीच्या ज्वाला पोहोचल्या होत्या. आठ अग्निशमन गाड्या, सहा जम्बो टँकर, एक एरियल वॉटर टॉवर टेंडर, उपकरणांची व्हॅन, एक बचाव व्हॅन, एक जलद प्रतिसाद वाहन आणि १०८ रुग्णवाहिका तैनात करण्यात आली होती. पहाटे ३:३० वाजता ही आग लेव्हल-२ पर्यंत पोहोचली, तर सव्वाचारच्या सुमारास ती लेव्हल-३पर्यंत पोहोचली होती. बाल्कनीत ठेवलेल्या फर्निचरमुळे आगीवर नियंत्रण मिळवताना अडथळा निर्माण झाला होता.
आग लागली की लावली?
आगीत जीवितहानी झाली नसली तरी कागदपत्रे आणि फर्निचर जळून मोठे नुकसान झाल्याचे म्हटले जाते. आगीत मोठ्या प्रमाणात तपासाची कागदपत्रे जळाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ही आग लागली की लावली? या दिशेनेही तपास सुरू आहे.
मुंबई महापालिकेतील कोविड कंत्राट, खिचडी पुरवठा या घोटाळ्यांपासून ते राज्य आणि देश-विदेश पातळ्यांवरील अनेक मोठे आर्थिक गैरव्यवहार, घोटाळे आणि काळ्या पैशांविरोधातील तपास ईडीच्या याच कार्यालयातून केला जात आहे. त्याची कागदपत्रे, पुरावे, इलेक्ट्राॅनिक दस्तऐवज या कार्यालयात आहेत.
ईडी कार्यालयातील कागदपत्रे जळाली की सुरक्षित आहेत, याबाबत अद्याप काहीही माहिती देण्यात आलेली नाही.