Join us  

पोरासाठी कायपण... अखेर राधाकृष्ण विखे पाटलांचा राजीनामा, राहुल गांधींनी स्वीकारला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 7:04 PM

राज्यातील काँग्रेस ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे. राज्यातील काँग्रेस ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधली गेली आहे.

मुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडे आपल्या विधानसभा विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर, राहुल गांधींनी तो राजीनामा स्विकारल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. त्यामुळे, गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर या वृत्तामुळे पडदा पडला आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्या मुलाचा प्रचार करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून त्यांच्यावर सातत्याने करण्यात येत होता. 

राज्यातील काँग्रेस ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे. राज्यातील काँग्रेस ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधली गेली आहे. काँग्रेससाठी ज्यांनी काहीच काम केले नाही ते आता काँग्रेस उभी करायला निघाले आहेत, अशी टीका राधाकृष्ण विखे यांनी श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे केली होती. येथे माजी नगराध्यक्ष संजय फंड यांच्या वस्तीवर आयोजित केलेल्या ससाणे समर्थकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांची बैठकही त्यांनी घेतली. पुत्र सुजय विखे यांचा अहमदनगर लोकसभा मतदारसंघात उघड प्रचारही त्यांनी केला.

विखे म्हणाले, ही राजकीय लढाई आपल्या अस्तित्वाची व अस्मितेची आहे. त्यामुळे तुम्ही कामाला लागा. कार्यकर्त्यांनी कुठल्याही आमिषाची अपेक्षा ठेवू नये. काँग्रेस पक्षाने माझ्यावर कारवाई करावी यासाठी काही जण देव पाण्यात बुडवून बसले आहेत. ज्या पक्षासाठी मी पाच वर्षे संघर्ष केला, सरकार विरोधी भूमिका घेतली तो पक्ष माझ्यासोबत नाही राहिला, तो तुमच्या मागे कधी राहील, असा सवाल विखे यांनी यावेळी उपस्थित केला.

पुत्र सुजय विखेंच्या भाजपा प्रवेशानंतर राधाकृष्ण यांच्या काँग्रेस सोडण्याची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, आज विखे यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असून राहुल गांधींनी तो राजीनामा स्विकारला आहे. लवकरच त्यांचा राजीनामा विधिमंडळ सभापतींकडे सुपूर्द केला जाईल. त्यामुळे, विखे आता काँग्रेस सदस्यपदाचाही राजीनामा देणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच, राधाकृष्ण विखेंच्या पुढील भूमिकेकडे काँग्रेस नेत्यांचे आणि महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.  

टॅग्स :राधाकृष्ण विखे पाटीलकाँग्रेसराहुल गांधीसुजय विखेभाजपामहाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019