दिशा सालीयन प्रकरण: "या लोकांवर गुन्हा दाखल करा", लेकीची बदनामी करणाऱ्यांची वडिलांनी दिली नावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 15:52 IST2020-08-08T15:37:57+5:302020-08-08T15:52:10+5:30
दिशाच्या वडिलांनी मालवणी पोलिसांना दिलेल्या अर्जात लेकीबद्दल चुकिच्या अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करा, असे म्हणत काही लोकांची नावेही दिल्याची माहिती आहे.

दिशा सालीयन प्रकरण: "या लोकांवर गुन्हा दाखल करा", लेकीची बदनामी करणाऱ्यांची वडिलांनी दिली नावे
- गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई: दिशा सालीयन (२८) गरोदर होती, असे म्हणत तिच्या मृत्यूला अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी जोडत तिची बदनामी करणाऱ्यांची नावे कुटुंबीयांनी मालवणी पोलिसांना दिली आहेत. तसेच, या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची विनंती तिच्या पालकांनी केली आहे. त्यानुसार, मालवणी पोलीस आता याबाबत काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दिशाचे वडील सतीश यांनी मालवणी पोलिसांना जो तक्रार अर्ज दिला आहे. त्यामध्ये दिशाची बदनामी करणाऱ्या तीन ते चार लोकांची नावे घेतली आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. दिशा गरोदर होती, तिच्या मृत्यूचा सुशांत सिंग राजपूत प्रकरणाशी संबंध होता असे वृत्त गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडिया तसेच काही वृत्तवाहिन्यांवर प्रकाशित होत होते. सगळे पाहून आम्ही 'डिप्रेशन' मध्ये गेल्याचेही दिशाची आई वासंती यांनी म्हटले होते.
दरम्यान, दिशाच्या वडिलांनी मालवणी पोलिसांना दिलेल्या अर्जात लेकीबद्दल चुकिच्या अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करा, असे म्हणत काही लोकांची नावेही दिल्याची माहिती आहे. मात्र त्यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. याप्रकरणी 'लोकमत'ने मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कालपाड यांना संपर्क केला. मात्र ते वरिष्ठांसोबत गणेशोत्सवासंदर्भात असलेल्या मीटिंगमध्ये व्यस्त असल्याने तो होऊ शकला नाही.