भारतीय अँजिओप्लास्टीचे जनक डॉ. मॅथ्यू सॅम्युएल यांचे निधन, नेत्यांपासून ते उद्योगपतींवर केले होते उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 11:20 IST2025-04-19T11:19:18+5:302025-04-19T11:20:59+5:30

Dr. Mathew Samuel News: मुंबईतील लीलावती आणि रिलायन्स रुग्णालयात ते नियमित रुग्णांना उपचार देण्यासाठी येत होते. 

Father of Indian Angioplasty Dr. Matthew Samuel passes away, treated people from leaders to industrialists | भारतीय अँजिओप्लास्टीचे जनक डॉ. मॅथ्यू सॅम्युएल यांचे निधन, नेत्यांपासून ते उद्योगपतींवर केले होते उपचार

भारतीय अँजिओप्लास्टीचे जनक डॉ. मॅथ्यू सॅम्युएल यांचे निधन, नेत्यांपासून ते उद्योगपतींवर केले होते उपचार

मुंबई :  भारतीय ‘अँजिओप्लास्टीचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे प्रख्यात हृदयविकारतज्ज्ञ डॉ. मॅथ्यू सॅम्युएल कालारिकल यांचे शुक्रवारी निधन झाले. चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. देशातील बड्या राजकीय नेत्यांपासून ते उद्योगपतींना त्यांनी उपचार दिले आहेत. 

मुंबईतील लीलावती आणि रिलायन्स रुग्णालयात ते नियमित रुग्णांना उपचार देण्यासाठी येत होते. 

डॉ. मॅथ्यू यांनी १९८६ मध्ये भारतातली पहिली अँजिओप्लास्टी यशस्वीपणे केली होती. त्यांनी आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील अनेक देशांमध्ये अँजिओप्लास्टी सुविधांची उभारण्यातही मोलाची भूमिका बजावली. 

त्यांचा  जन्म ६ जानेवारी १९४८ रोजी केरळमध्ये झाला होता. त्यांनी कोट्टायम मेडिकल कॉलेजमधून पदवी संपादन केली आणि त्यानंतर चेन्नईमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत हृदयरोगविशेषज्ञ म्हणून आपली कारकीर्द सुरू केली होती.

डॉ. मॅथ्यू सॅम्युएल यांच्या निधनाची बातमी कळताच राज्यातील अनेक डॉक्टरांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

डॉ. मॅथ्यू सॅम्युएल यांच्याबाबत लीलावती रुग्णालयाचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. हरेश मेहता यांनी सांगितले, अँजिओप्लास्टी विषयातील आपल्या देशात त्यांचे नाव सर्वात मोठे होते. सतत मदत करण्याच्या भूमिकेत असणाऱ्या डॉ. मॅथ्यू यांनी माझ्या काही रुग्णाच्या उपचारासाठी मदत केली होती. 

डॉ. मॅथ्यू  यांना अनेक सन्मान आणि पुरस्कार प्राप्त झाले आहेत, त्यामध्ये त्यांना २००० साली पद्मश्री पुरस्कार आणि ११९६ साली वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित डॉ. बी. सी. रॉय पुरस्कार सन्मानित करण्यात आले होते. ११९५ ते १९९७ दरम्यान ते आशियाई-पॅसिफिक इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी सोसायटीचे अध्यक्ष होते.

Web Title: Father of Indian Angioplasty Dr. Matthew Samuel passes away, treated people from leaders to industrialists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.