Join us  

शेतकऱ्यांना दिलासा मिळणार, विदर्भ अन् मराठवाड्यात पाऊस येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 4:48 PM

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून 21 सप्टेंबर रोजी त्याचे राज्यात आगमन होण्याचे संकेत आहे.

मुंबई - बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून 21 सप्टेंबर रोजी त्याचे राज्यात आगमन होण्याचे संकेत आहे. त्यामुळेच विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य-महाराष्ट्रातील बऱ्याच भागात 21 आणि 22 सप्टेंबर रोजी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या बातमीमुळे पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 

राज्यात गेल्या कित्येक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे आगमन होणार आहे. खरीप हंगामात वाढणाऱ्या पिकांसाठी शेतकरी वरुरणराजाकडे डोळे लावून बसले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यांसह आसपासच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसाच्या या स्थितीमुळे नदी-नाल्यांना पूर येण्यासारखी स्थिती उद्भवू शकते. ज्यामुळे काही गावांचा संपर्कही तुटू शकतो. म्हणूनच नदी-नाल्यांच्या काठी राहणाऱ्या लोकांनी सावध राहावे. 

उर्वरित विदर्भ, मराठवाडा, मध्य-महाराष्ट्र आणि खानदेशात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडेल. मुंबई आणि कोंकणातही या दरम्यान पावसाच्या काही सरी कोसळतील. परंतु, दक्षिण मध्य-महाराष्ट्र आणि दक्षिण-मराठवाड्यात पावसाची शक्यता कमी राहील. या पावसामुळे राज्यातील तापमान तात्पुरते कमी होतील. परंतु आगामी आठवड्यापासून तापमानात परत वाढ होईल आणि उष्णता जाणवेल. शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. तर, नदी-नाल्यांच्या काठी राहणाऱ्या लोकांनी सावध राहावे,असेही सांगण्यात आले आहे.  

टॅग्स :पाऊसशेतकरीविदर्भमराठवाडा