Join us

डोळे मान्सूनकडे! हवामान अनुकूल; मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 06:53 IST

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

मुंबई : कासवगतीने पुढे सरकलेला मान्सून येत्या दोन ते तीन दिवसांत केरळमध्ये दाखल होईल, असा हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज कायम असून, हवामानातील बदलामुळे येत्या १ जूनपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. सोसाट्याचा वारा वाहील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे होते. कोकण, गोवा व विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.

मुंबईत सद्यस्थितीमध्ये ढगाळ हवामानाची किंचित नोंद होत असून, उकाडा मात्र सातत्याने घाम काढत आहे. मुंबईचे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आहे, तर आर्द्रता कमी अधिक फरकाने ६० टक्क्यांवर नोंदविण्यात येत आहे. 

२९ मे - कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.

३० आणि ३१ मे - कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

१ जून- कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :पाऊसमहाराष्ट्रमुंबईकोकण