एसटी प्रवासभाडे सवलतीसाठी ‘स्मार्टकार्ड’ बंधनकारक करण्यास मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 19:55 IST2019-12-26T19:55:28+5:302019-12-26T19:55:46+5:30
ज्येष्ठ नागरिक, विविध पुरस्कारार्थी, अधिस्विकृतीधारक पत्रकार तसेच व्याधीग्रस्त रुग्ण यांना स्मार्टकार्ड ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत प्राप्त करणे आवश्यक होते.

एसटी प्रवासभाडे सवलतीसाठी ‘स्मार्टकार्ड’ बंधनकारक करण्यास मुदतवाढ
मुंबई : राज्य परिवहन (एस टी) महामंडळाच्यावतीने विविध सामाजिक घटकांना एसटी प्रवासभाडे सवलतीसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘स्मार्टकार्ड’ योजना बंधनकारक करण्यास 1 एप्रिल 2020 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. यासंदर्भात नागपूर अधिवेशनादरम्यान विविध लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिकांनी परिवहनमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.
राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने विविध घटकांसाठी १ जून २०१९ पासून स्मार्टकार्ड योजना सुरू करण्यात आली असून सद्यस्थितीत ३० लाख ९७ हजार ७२६ जणांची नोंद झाली आहे. या योजनेसाठी ज्येष्ठ नागरिक, विविध पुरस्कारार्थी, विद्यार्थी तसेच व्याधीग्रस्त रुग्णांना ३१ डिसेंबर 2019 पर्यंत स्मार्टकार्ड मिळविणे आवश्यक होते. नोंदणीला मिळालेला प्रतिसाद पाहता ही मुदत वाढून देण्याची मागणी लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिकांनी केली होती. त्यास परिवहन मंत्री देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
ज्येष्ठ नागरिक, विविध पुरस्कारार्थी, अधिस्विकृतीधारक पत्रकार तसेच व्याधीग्रस्त रुग्ण यांना स्मार्टकार्ड ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत प्राप्त करणे आवश्यक होते. परंतु आता ही मुदत ३१ मार्च २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे व 1 एप्रिल 2020 पासून स्मार्टकार्ड बंधनकारक करण्यात येत आहे. मासिक, त्रैमासिक पासधारकांना स्मार्टकार्ड १५ फेब्रुवारी २०२० पासून बंधनकारक करण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी १ जुन २०२० पासून स्मार्टकार्ड बंधनकारक करण्यात येत आहे.
दिव्यांगांसाठी अद्याप स्मार्टकार्ड योजना लागु करण्यात आली नाही. त्यामुळे दिव्यांगांसाठी सद्याचीच कार्यपद्ध्ती लागु राहील. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. सर्व घटकांनी विहित कालावधीत स्मार्टकार्ड प्राप्त करुन घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.