Join us

आधी विस्तार होणार की खातेवाटप?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर पेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 06:39 IST

भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांकडील खाती राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्य मंत्रिमंडळाचा आणखी एक विस्तार केल्यानंतरच एकत्रितपणे खातेवाटप जाहीर करतील की आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले जाईल या बाबतचा पेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसा सोडवतात याबाबत उत्सुकता आहे. भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांकडील काही महत्त्वाची खाती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे जातील, हे स्पष्ट आहे. 

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना आधीच खातेवाटप जाहीर केले आणि महत्त्वाची काही खाती दिली तर विस्ताराची वाट बघत असलेल्या भाजप, शिंदे समर्थक आमदारांमध्ये अधिकच अस्वस्थता पसरेल. त्यावर दोन-तीन दिवसांत विस्तार करून एकत्रित खातेवाटपाचा तोडगा निघेल, अशी चर्चा आहे. तथापि, तिसरा विस्तार अनिश्चित असताना उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटपासाठी ताटकळत ठेवले तर माध्यमे त्यावर टीका करतील, असा दुहेरी पेच आहे. 

भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांकडील काही खाती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दिली जातील. त्यात मंगलप्रभात लोढा यांच्याकडील महिला व बालकल्याण, गिरीश महाजन यांच्याकडील ग्रामविकास वा वैद्यकीय शिक्षण, रवींद्र चव्हाण यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा अशी काही खाती असू शकतात. 

विस्तारासाठी शिंदेंवर दबाव

राष्ट्रवादीच्या नऊ जणांना अचानक कॅबिनेट मंत्री केल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचे म्हटले जाते. आता १४ मंत्रिपदे रिक्त आहेत. लगेच विस्तार करा असा आग्रह काही आमदारांनी शिंदे यांच्याकडे धरला असल्याचे समजते. १४ पैकी भाजपला सात ते आठ मंत्रिपदे दिली गेली तर शिंदे गटाला सहाच  मंत्रिपदे मिळतील.

अजित पवारांना वित्त की आणखी काही?

अजित पवार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास खाते दिले जाईल, की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील गृह वा वित्त खाते दिले जाईल याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. वित्त मंत्री असताना अजित पवार यांनी राष्ट्रवादीला झुकते माप दिले, असा आरोप शिंदे समर्थक आमदार करत आले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांना दुसरे खाते देऊन महसूल खाते अजित पवारांना दिले जाईल, अशीही एक चर्चा आहे.

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसएकनाथ शिंदे