Examine those clips in the forensic lab, revealing by Dhananjay Munde on comment of pankaja | 'त्या' क्लिपची फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी करा, धनंजय मुंडेंचा खुलासा
'त्या' क्लिपची फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी करा, धनंजय मुंडेंचा खुलासा

बीड - परळी मतदारसंघात पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी केलेले आरोप आणि व्हायरल क्लिपसंदर्भात धनंजय मुंडेंनी खुलासा केला आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करुन ते चुकीची व्हिडीओ क्लिप बनविण्यात आल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे. धनंजय मुंडेंनी पंकजा यांच्यावर टीका करताना, आमच्या दोघात केवळ हाच फरक असल्याचं सांगत त्यांना टार्गेट केलं होतं. मी पंडित आण्णांच्या घरात जन्माला आलो आणि त्या गापीनाथ मुंडेंच्या घरात जन्माला आल्या. त्या मोठ्याच्या पोटी जन्माला आल्या, असे म्हणत धनंजय यांनी पंकजा मुंडेंवर टीका केली होती.  

धनंजय मुंडेंच्या वक्तव्याची क्लिप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाली. या व्हायरल क्लिपनंतर पंकजा मुंडेंच्या समर्थकांना धनंजय मुंडेना अटक करण्याची मागणी केली. महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही राज्य महिला आयोगाकडे करण्यात आली आहे. स्वत: पंकजा मुंडेंनीही आपल्या भाषणात धनंजय मुंडेंच्या टीकेबद्दल आक्षेप घेतला होता. त्यामुळे भावना उचंबळून आल्याने त्यांना भरसभेत भोवळही आली होती. मात्र, धनंजय मुंडेंनी आपल्या फेसबुक पोस्टवरुन याबाबत खुलासा केला आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असून बनावट व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्यात येत असल्याचे धनंजय यांनी म्हटले.  

शनिवारी माझ्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावर व्हायरल झालेली ती क्लिप एडिट करून, वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी आहे. ती क्लिप पूर्णपणे चुकीची असून त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासावी, असे स्पष्टीकरण धनंजय मुंडेंनी दिलंय. अशी क्लिप एडिट करणाऱ्यांनी किमान बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा तरी आदर ठेवावा, आपली निवडणूक विकास कार्यावर आहे, ती भावनिकतेवर घेऊन जाताना इतकी खालची पातळी गाठू नका ही कळकळीची विनंती आहे, असे भावनिक आवाहनही मुंडेंनी केलंय. 


Web Title: Examine those clips in the forensic lab, revealing by Dhananjay Munde on comment of pankaja
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.