परीक्षा शुल्कवाढीने पालकांच्या खिशाला झळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 12:03 IST2025-10-22T12:03:06+5:302025-10-22T12:03:26+5:30
दहावीसाठी ४७० रुपये, तर बारावीसाठी ४९० रुपये शुल्क आकारणी; नावनोंदणी अर्जाची मुदत ३० ऑक्टोबरपर्यंत

परीक्षा शुल्कवाढीने पालकांच्या खिशाला झळ
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : यावर्षीच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठीची नावनोंदणी अर्जाची मुदत आठ दिवसांनी म्हणजेच ३० ऑक्टोबर रोजी संपणार आहे. यंदा माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने परीक्षेचे शुल्क ५० रुपयांनी वाढवलेले आहे. मात्र, सर्वसामान्य विद्यार्थी महागाईमध्ये होरपळलेला असताना हे परीक्षा शुल्क वाढायला नको होते, अशी प्रतिक्रिया शिक्षण वर्तुळातून उमटलेली आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षासाठी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी १ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाइन प्रवेश नोंदणी करणे आवश्यक आहे. व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आयटीआय संस्थांमार्फत ऑनलाइन अर्ज नोंदणी करणे बंधनकारक असून, अर्ज प्राचार्यांद्वारेच सादर केले जातील.
मागील वर्षी दहावीच्या परीक्षेसाठीचे शुल्क ४२० रुपये होते. यंदा ते ४७० इतके झाले. तर बारावीचे शुल्क ४४० होते. यंदा त्यात ५० रुपयांनी वाढवून ४९० इतके शुल्क केले. शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पेपर किमतीमध्ये वाढ व इतर अनुषंगिक खर्चामुळे परीक्षा शुल्क वाढविल्याचे स्पष्ट केले. तर पालक शरद गायकवाड यांनी महागाईत परीक्षा शुल्क वाढवायला नको होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
शाळांसाठी महत्त्वाची सूचना
यू-डायसमध्ये विद्यार्थ्यांचे नाव नसल्यास त्या विद्यार्थ्यांचे अर्ज स्वतंत्रपणे भरून परीक्षा मंडळाकडे पाठवणे अत्यावश्यक आहे. १७ क्रमांकाचा फॉर्म भरण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत असून या विद्यार्थ्यांना विलंब शुल्क १०० रुपये आहे.
परीक्षा मंडळाच्या सूचना
बारावी परीक्षेचा उशिरा अर्ज भरण्यासाठी २१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर, परीक्षा शुल्क उशिराने ७ नोव्हेंबर, तर शाळांनी मंडळाकडे विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करण्याची मुदत १० नोव्हेंबर असल्याचे परीक्षा मंडळाने जाहीर केले आहे. मात्र, यासंदर्भात प्राचार्यांनी विद्यार्थ्यांची माहिती पडताळणी आवश्यक आहे.
यंदा अतिवृष्टीमुळे महागाईने जनता त्रस्त आहे. त्यामुळे या वर्षी दहावी बारावीचे परीक्षा शुल्क वाढवायला नको होते. - संजय पाटील, अध्यक्ष, बृहन्मुंबई मुख्याध्यापक संघटना.