Join us  

'सगळी सोंग करता येतात, पण व्यवहारात पैशाचं सोंग करता येत नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 1:19 PM

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सावरकरांवरील वादाबाबत सावध भूमिका घेतल्याचं दिसून आलं.

मुंबई - हिवाळी अधिवेशनासाठी सर्वच राजकीय पक्षांचे आमदार नागपूरला पोहोचले आहेत. मात्र, सावरकरांच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला आहे. तसेच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 25 रुपयांची मदत देण्याचीही मागणी केलीय. याबाबत राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी महाविकास आघाडीची मानसिकता असून लवकरच हा प्रश्न मार्गी निघेल, असे त्यांनी सांगितले.  

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सावरकरांवरील वादाबाबत सावध भूमिका घेतल्याचं दिसून आलं. महाविकास आघाडीत फूट पडण्यासाठी काहीजण देव पाण्यात बुडवून वाट पाहत आहेत. पण, शरद पवार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मोठे जाणकार आणि प्रगल्भ नेते आहेत. त्यामुळे, ते योग्यपणे आपली भूमिका घेतील, असे त्यांनी म्हटले आहे. तर, अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतही त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. 

शेतकऱ्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारने सर्वोतपरी प्रयत्न केले पाहिजेत. शेतकऱ्यांना मदत मिळावी ही सर्वांचीच मागणी होती. सरकारमध्ये बाहेर असताना सरकारची आर्थिक परिस्थिती काय आहे हे माहित नसतं. पण, तुम्ही सरकारमध्ये गेल्यानंतर..., सगळी सोंग करता येतात, पण व्यवहारात पैशाचं सोंग करता येत नाही, असे अजित पवार यांनी म्हटले. झी 24 तास वृत्तवाहिनीशी बोलताना अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली. 

राज्य चालवत असताना, राज्यामध्ये जो अधिकारी वर्ग आहे, त्यांचं महिन्याच्या महिन्याला पेमेंट, एससीएसटी वर्गाला दिलेला निधी, ओबीसी आणि इतर वर्गाच्या विकासासाठी दिलेला निधी, विकासाच्या कामावर कुठलाही परिणाम होणार नाही, या सगळ्याचा साधक बाधक विचार करुन कितपर्यंत आपण कर्ज उचलू शकतो. आपलं उत्पन्न किती आहे, आपली मर्यादा किती शिल्लक आहे, केंद्र सरकार आपल्याला काही मदत करतंय का? या सगळ्यांचा विचार करायचा असतो. 

मी अर्थमंत्री म्हणून काम केलेलंय, जयंत पाटील यांनी 9 वर्षे काम पाहिलंय. तर, सुनिल तटकरे यांनीही 1 वर्ष अर्थमंत्रीपद सांभाळलंय. आज अर्थ व नियोजन खातं जयंतराव अन् भुजबळांकडे आहे, या सगळ्याचा साकल्ल्यानं विचार करुन निर्णय घेतला पाहिजे. त्या खात्याचे प्रमुखही वस्तुस्थिती आणि आव्हान लक्षात घेऊन, चर्चा करतात. त्यानंतर मार्ग काढतात. महाविकास आघाडीची तशी मानसिकता झाली असून लवकरच तसं चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळेल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसशेतकरीपाऊसशिवसेना