'गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे भाषण ऐकत आहे'; शरद पवारांची प्रतिक्रिया

By मुकेश चव्हाण | Published: October 28, 2020 04:01 PM2020-10-28T16:01:28+5:302020-10-28T16:03:27+5:30

प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या विधानावरुन वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही.

Everyone has the freedom to make their party bigger, said NCP President Sharad Pawar | 'गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे भाषण ऐकत आहे'; शरद पवारांची प्रतिक्रिया

'गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे भाषण ऐकत आहे'; शरद पवारांची प्रतिक्रिया

googlenewsNext

मुंबई: राज्यात एकहाती शिवसेनेचा भगवा फडकवण्यास सज्ज राहा, आत्तापासूनच तयारीला लागा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले आहेत. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी हे विधान केलं आहे. उद्धव ठाकरेंच्या या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार म्हणाले की, गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे भाषण ऐकत आलो आहे. प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या विधानावरुन वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. शरद पवार कांदाप्रश्नी नाशिक दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे. 

तत्पूर्वी, व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुरु असलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन केले. या बैठकीत जिल्हाप्रमुखांनी उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचं कौतुकही केले. जिल्हाप्रमुखांनी जिल्ह्याच्या विकासासाठी काम करावं, सध्या आर्थिक निधीची कमतरता आहे मात्र लवकरच यावत तोडगा काढू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी जिल्हाप्रमुखांना दिला. कोविड काळात राज्य सरकारने केलेली काम जनतेपर्यंत पोहचवा. शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला ताकद देण्यात येईल असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.

दरम्यान, दसरा मेळाव्यावेळी ऑनलाइन भाषण करताना उद्धव ठाकरेंनी भाजपाचा खरपूस समाचार घेतला होता. माय मरो पण गाय वाचो, असं आमचं हिंदुत्व नाही. इथं गोमाता आणि शेजारच्या गोव्यात खाता. असं आमचं हिंदुत्व नाही. पण घंटा बडवा, थाळ्या वाजवा इतकंच तुमचं हिंदुत्व आहे. फक्त काळ्या टोप्या घालू नका, त्याखाली मेंदू असेल तर  विचार करा, असा हल्लाबोल ठाकरे  यांनी केला होता.

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतरचा हा पहिला दसरा मेळावा  होता. शिवाय, कोरोनासह राज्यात विविध  मुद्यांवरून सरू असलेल्या राजकीय  घमासानाबाबत ठाकरे काय  भूमिका घेतात, याबाबत उत्सुकता होती. राज्यपाल-मुख्यमंत्री संघर्ष, जीएसटी, बिहारचं राजकारण, सुशांतसिंह मृत्यू प्रकरण, कंगना राणौतवरून निर्माण झालेला वादंग अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी अत्यंत आक्रमक शैलीत समाचार घेतला. तर, मराठा, धनगर, ओबीसी आरक्षणाबाबतही नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता.

Web Title: Everyone has the freedom to make their party bigger, said NCP President Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.