Eleventh admission application process from 26th July | अकरावी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया २६ जुलैपासून

अकरावी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया २६ जुलैपासून


मुंबई : राज्याच्या काही भागांत वाढलेल्या कडक लॉकडाऊनमुळे अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी आता २६ जुलैपासून प्रत्यक्ष अर्ज भरून नोंदणी करू शकणार आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांना सरावासाठी १६ जुलैपासून अकरावी प्रवेश प्रक्रियेचे संकेतस्थळ खुले करण्यात येणार असून ते २४ जुलैपर्यंत खुले असणार आहे. या दरम्यान विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज व त्यातील माहिती नष्ट करण्यात येईल आणि २६ जुलैपासून प्रत्यक्ष अर्जाचा भाग १ भरण्यास सुरवात होईल अशी माहिती उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. सुरुवातीला विद्यार्थ्यांना १६ जुलैपासून प्रत्यक्ष अर्ज भरून नोंदणी करता येणार होती. मात्र आता शिक्षण संचलनालयाकडून मुंबई महानगर क्षेत्र, पिंपरी चिंचवड, नाशिक , औरंगाबाद, नागपूर , अमरावतीया क्षेत्रांसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

उपसंचालक कार्यालयांनी अकरावी प्रवेशाची कार्यवाही सुधारित वेळापत्रकाप्रमाणे करण्याचे निर्देश शिक्षण संचलनालयाकडून देण्यात आले आहेत. अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना https://mumbai.11thadmission.org.in या संकेतस्थळावर येत्या २६ तारखेपासून नोंदणी करता येणार आहे.   २६ जुलैला सुरु होणाऱ्या पहिल्या टप्प्यात ऑनलाईन नोंदणी, प्रवेश अर्ज (भाग १) भरायचा आहे. यामध्ये विद्यार्थी, पालक यांनी स्वतः ही प्रक्रिया करायची आहे किंवा पालक शाळांची मदत घेऊ शकतात. सोबतच अर्जातील माहिती प्रमाणित करण्यासाठी शाळा किंवा मार्गदर्शन केंद्र निवडणे यासाठी हा टप्पा असणार आहे.  २७ जुलैपासून  संबंधित शाळा आणि मार्गदर्शन केंद्रांना विद्यार्थ्यांकडून आलेले अर्ज प्रमाणित करता येणार आहेत. या दरम्यान अर्जामध्ये काही त्रुटी किंवा आवशकता असल्यास विद्यार्थ्यांशी संपर्क साधता येणार आहे.

राज्य मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग २ भरायचा आहे. यामध्ये प्रवेशासाठी महाविद्यालयांचा पसंतीक्रम विद्यार्थ्यांना नोंदवून सबमिट आणि लॉक करायचा आहे. विद्यार्थ्यांना हा अर्ज कधीपर्यंत भरता येईल याचा कालावधी दहावीच्या निकालानंतर जाहीर करण्यात येणार आहे.

प्रवेश अर्ज भरण्यासाठी सरावाची सुविधा
मूळ अर्ज भरताना विद्यार्थ्यांकडून चुका होऊ नयेत, त्याचा सराव करता यावा यासाठी यंदा शिक्षण संचलनालयाकडून सर्व अर्जासाठी प्रारूप लॉगिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यात माहिती भरावी आणि सराव करावा असे आवाहन उपसंचालक कार्यालयाकडून करण्यात आले आहे. २४ जुलैनंतर ही माहिती नष्ट करण्यात येईल आणि विद्यार्थ्यांना २६ जुलै पासून नवीन अर्ज भरता येईल हे उपसंचालक कार्यालयांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Eleventh admission application process from 26th July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.