मुंबई : मंत्रालयात काही मंत्र्यांची दालने अद्यापही तयार झाली नसली तरी जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी मंत्र्यांनी थेट जनता दरबार घेण्याचे आदेश शिंदेसेनाप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार आता शिंदेसेनेचे कार्यालय असलेल्या बाळासाहेब भवनात दर आठवड्याला सोमवार ते बुधवार असे तीन दिवस तीन सत्रांमध्ये शिवसेना मंत्री जनतेच्या भेटीसाठी उपलब्ध राहणार असल्याची माहिती पक्षाने दिली आहे.
शिदेसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार पक्ष कार्यकर्त्यांनाही या तीन दिवसांत थेट मंत्र्यांना भेटता येणार आहे. राज्यातील गोरगरीब जनतेचे गाव, तालुका पातळीवरील तसेच मंत्रालयासंबंधित अडचणी आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिवसेनेचे ११ मंत्री आठवड्यातील तीन दिवस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असणार आहेत.
कोणते मंत्री कधी भेटणार?
सोमवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत उद्योग मंत्री उदय सामंत, सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, तर सायंकाळी ४ ते ७ या वेळेत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे सर्वसामान्यांच्या अडचणी जाणून घेतील.
मंगळवारी सकाळी ९ ते ११ यावेळेत गृहराज्य मंत्री योगेश कदम, सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत वित्त, नियोजन, राज्यमंत्री आशिष जयस्वाल सायंकाळी ४ ते ७ यावेळेत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे मंत्री जनतेच्या समस्या जाणून घेतील.
बुधवारी सकाळी ९ ते ११ यावेळेत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर सायंकाळी ४ ते ७ यावेळेत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले जनतेच्या समस्या ऐकून घेतील, असे सचिव संजय मोरे यांनी सांगितले.