"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 23:18 IST2025-10-02T23:17:56+5:302025-10-02T23:18:32+5:30
Eknath Shinde trolls Uddhav Thackeray Shivsena Dasara Melava : सभेत चिखल झाला होता, पण नेत्यांचा मात्र 'रॅम्प वॉक सुरू होता!

"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
Eknath Shinde trolls Uddhav Thackeray Shivsena Dasara Melava : शिवसेनेचे आज मुंबईत दोन दसरा मेळावे झाले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना-उबाठाचा मेळावा शिवाजी पार्कच्या मैदानावर झाला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी सरकारवर आणि शिंदे गटावर टीका केली. त्यानंतर गोरेगावच्या नेस्को मध्ये एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा झाला. या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच त्यांच्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावरून शेलक्या शब्दांत टीका केली.
हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो...
"पूरग्रस्त भागामध्ये शिवसैनिकांनी साथीचे आजार पसरू नये म्हणून स्वच्छता मोहीम घेतली. आम्ही तेथे डॉक्टर पाठवले. बळीराजाच्या आरोग्याची तपासणी झाली. कारण ती खरी गरज होती. पण काही लोक हात हलवत गेले आणि तोंड वाजवत परत आले. आणि आता तेच लोक आमच्यावर टीका करत आहेत. पण या लोकांचे दौरे म्हणजे... हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो सर्दी जुकाम.." अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या पहाणी दौऱ्याची खिल्ली उडवली.
सर्वसामान्य माणसाशी असलेली बांधिलकी आणि नाळ तुटता कामा नये!
"आज दुसऱ्या सभेमध्ये सर्व लोक चिखलामध्ये बसले होते. सभेमध्ये चिखल झाला होता, पण नेत्यांच्या पायाला चिखल लागू नये म्हणून एक मोठा रॅम्प लावण्यात आला होता. त्यावरून नेते मंडळींचा रॅम्प वॉक सुरू होता. पण एक लक्षात ठेवा, सर्वसामान्य माणूस हाच आपला केंद्रबिंदू असतो, आधार असतो. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही मी म्हणत होतो की मी कॉमन मॅन आहे. आणि आताही मी पुन्हा सांगतो की आता मी डीसीएम म्हणजेच डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे. कारण सर्वसामान्य माणसाशी असलेली बांधिलकी आणि नाळ तुटता कामा नये," असे त्यांनी ठणकावून सांगितले.
तुम्ही साधा बिस्किटचा पुडा तरी दिलात का?
"बाळासाहेब ठाकरे सांगायचे की कार्यकर्ता हा घरात नव्हे तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. आम्ही तेच करतो. यावेळीही आम्ही मदतीचे किट घेऊन पूरग्रस्तांना दिलासा द्यायला गेलो होतो. तुम्ही (उद्धव ठाकरे) नुसते गेलात. तिथल्या लोकांना तुम्ही साधा बिस्किटचा पुडा तरी दिलात का? आता म्हणतात की माझ्या हातात काही नाही, सत्ता नाही... जेव्हा तुमच्याकडे सत्ता होती तेव्हाही तुम्ही काहीच दिले नाहीत. कारण लोकांना देण्यासाठी दानत लागते. ती दानत आमच्याकडे आहे, तुम्ही काहीही देऊ शकत नाही. कारण तुम्ही कायम 'लेना' बँक असता, आम्ही 'देना' बँक आहेत. आम्ही कायम अडचणीत असलेल्यांना मदत देत असतो," असेही एकनाथ शिंदे यांनी सुनावले.