Eknath Shinde: एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तीन प्रस्ताव, उद्धव ठाकरे मान्य करणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 14:35 IST2022-06-21T14:35:02+5:302022-06-21T14:35:41+5:30
Eknath Shinde: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तीन प्रस्ताव, उद्धव ठाकरे मान्य करणार?
मुंबई - शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच मोठ्या बंडाच्या पावित्र्यात असलेल्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तीन प्रस्ताव दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार बंड मागे घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी काही अटी घातल्या आहेत. त्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत यापुढे आघाडी नको. त्याऐवजी शिवसेनेने भाजपासोबत युती करून सत्ता स्थापन करावी. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद द्यावं आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद द्यावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्याकडे २० ते ३५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे. तर पक्षांतर बंदीचा कायदा लागू होऊ नये यासाठी एकनाथ शिंदे यांना किमान ३७ आमदारांचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे. दरम्यान, आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलेल्या बैठकीमध्ये केवळ १८ विधानसभा आमदार उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे.