Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 16:22 IST2025-12-24T16:21:57+5:302025-12-24T16:22:42+5:30
Eknath Shinde On Thackeray Yuti : 'त्यांच्या पत्रकार परिषदेत मुंबईच्या विकासावर एक शब्दही बोलला गेला नाही. त्यांच्याकडे मुंबईच्या विकासाचा अजेंडा नाही. यांचा अजेंडा फक्त सत्तेसाठी आहे. '

Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
Eknath Shinde On Thackeray : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसेने अधिकृतरित्या युतीची घोषणा केली आहे. या युतीच्या निमित्ताने तब्बल वीस वर्षांनंतर ठारके बंधू एकत्र आले आहेत. दरम्यान, या युतीवर आता उपमुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी निशाणा साधला. काही युती या जनतेच्या आणि विकासाच्या दृष्टीने होतात. महायुती ही महाराष्ट्र आणि मुंबईच्या विकासासाठी आहे. मात्र ठाकरे बंधूंची युती ही केवळ सत्तेसाठी आहे, असा थेट टोला शिंदेंनी लगावला.
युती कुणाचीही कुणाशी झाली तरी महाराष्ट्रात महायुती भक्कमपणे उभी असल्याचा दावा शिंदे यांनी केला. लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला जनतेचा कौल मिळाला आहे. त्यामुळे सत्तेसाठी झालेल्या युत्यांमुळे आम्हाला काहीही फरक पडत नाही, असेही शिंदे म्हणाले.
◻️LIVE📍बाळासाहेब भवन,मुंबई 🗓️ 24-12-2025 📹 कोल्हापूर व नाशिक येथील उबाठा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश - लाईव्ह https://t.co/D0tnEHJCj4
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 24, 2025
मुंबई महापालिकेसाठी स्वार्थी युती
मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र आले असल्याचा आरोप करताना शिंदे म्हणाले, यांनी मुंबई महापालिकेकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिले. आता ती कोंबडीच कापून खाण्याचे काम सुरू आहे. ठाकरे बंधूंची युती ही स्वार्थासाठी आणि स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी आहे. जनता त्यांना त्यांची जागा नक्कीच दाखवेल. युती झाली तरी विठ्ठल आमच्याकडे आहे, असे विधानही शिंदे यांनी केले.
‘मुंबईच्या विकासाचा अजेंडा नाही’
त्यांच्या पत्रकार परिषदेत मुंबईच्या विकासावर एक शब्दही बोलला गेला नाही. त्यांच्याकडे मुंबईच्या विकासाचा अजेंडा नाही. यांचा अजेंडा फक्त सत्तेसाठी आहे. बाळासाहेबांचा विचार ज्यांनी सोडला, त्यांना जनतेने आधीच त्यांची जागा दाखवली आहे. असली आणि नकली काय, हे नगरपालिकेच्या निवडणुकांत स्पष्ट झाले.
मराठी माणूस मुंबईबाहेर गेला, जबाबदार ठाकरे
आमचा अजेंडा स्पष्ट आहे, मुंबईचा विकास. त्यांनी मुंबईसाठी नेमकं काय केले हे सांगावे. मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला, त्याला हेच जबाबदार आहेत. त्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणण्याचे काम आम्ही करणार आहोत. रमाबाई आंबेडकर नगरमधील 17 हजार घरांचा प्रकल्प आम्ही मार्गी लावला आहे. त्यांच्या अजेंडामध्ये असे काय आहे? असा सवाल शिंदेंनी केला.
निवडणुका आल्या की, ‘मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार’ असे फलक लावले जातात. पण मुंबईकर सुज्ञ आहेत. त्यांना विकास हवा आहे. आमचे निर्णय मुंबईकरांच्या हिताचे आहेत. पुढील सहा महिन्यांत मुंबई खड्डेमुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शेवटी शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले, कोरोनाच्या काळात फक्त पैसे खाल्ले गेले. जे स्वतःच्या पोरांना सांभाळू शकत नाहीत, ते राज्य काय सांभाळणार?