मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 12:47 IST2025-08-02T12:42:36+5:302025-08-02T12:47:51+5:30
काँग्रेस-राष्ट्रवादीने भगवा दहशतवाद शब्दाचा प्रयोग केला. तो कोर्टात खोटा ठरला. हिंदू दहशतवाद खोटे होते हे षडयंत्र उघड झाले असं मनीषा कायंदे यांनी म्हटलं.

मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
मुंबई - काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या विधानाविरोधात शिंदेसेना आक्रमक झाली आहे. हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा काढला. मात्र पोलिसांनी १०० मीटर अंतरावरच या कार्यकर्त्यांना रोखले. माजी खासदार राहुल शेवाळे, मनीषा कायंदे, शीतल म्हात्रे, शायना एन.सी यांच्यासह अनेक नेते कार्यकर्त्यांसह या मोर्चात सहभागी झाले. या मोर्चात काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
याबाबत माजी खासदार राहुल शेवाळे म्हणाले की, मालेगाव बॉम्बस्फोटात कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना पृथ्वीराज चव्हाण यांनी हिंदू धर्माचा अपमान केला. हिंदू धर्माचा अपमान आम्ही सहन करणार नाही. वारंवार काँग्रेसकडून सनातन धर्माचा अपमान करणारी विधाने केली जातात. हिंदुत्वाबाबत आम्ही हे खपवून घेणार नाही असं त्यांनी सांगितले. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीने भगवा दहशतवाद शब्दाचा प्रयोग केला. तो कोर्टात खोटा ठरला. हिंदू दहशतवाद खोटे होते हे षडयंत्र उघड झाले असं मनीषा कायंदे यांनी म्हटलं.
तर सनातन धर्माला दहशतवादी म्हणता, त्यावर हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या पक्षाने उत्तर द्यायला हवे. हिंदूंमध्ये फूट पाडता, हिंदूविरोधी विधाने करतात. हा भगवा महाराष्ट्र आहे. हिंदुत्ववादी देश आहे अशी भावना शिंदेसेनेच्या नेत्यांनी व्यक्त करत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. या कार्यकर्त्यांनी टिळक भवनाच्या दिशेने मोर्चा काढला. मात्र पोलिसांनी वेळीच खबरदारी घेत हा मोर्चा १०० मीटर अंतरावर अडवला. परंतु आम्हाला टिळक भवनात जाऊ द्या, आम्ही निवेदन देतो अशी भूमिका शिंदेसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, अनैतिक मार्गाने तुम्ही सरकारमध्ये आलात, हे हिंदू धर्मात बसते का? हिंदू धर्म काय ते समजून घ्या, सरकारमध्ये शिंदेसेनेची पत गेलेली आहे. केविळवाणा प्रयत्न करून जनतेपर्यंत जाण्याचा हा प्रकार आहे. दहशतवादाला कुठलाही धर्म नसतो हीच काँग्रेसची भूमिका आहे. कुठल्याही धर्माला दहशतवादाचे नाव जोडता कामा नये. धर्म दहशतवाद शिकवत नाही ही वस्तूस्थिती आहे. दिवसेंदिवस शिंदेसेनेची अब्रु वेशीवर टांगली जात आहे. यांच्या नेत्यांची विधाने, पैशांच्या बॅगा असलेले व्हिडिओ समोर येत आहेत. त्यावरून त्यांची पत गेलेली आहे म्हणून अशी आंदोलने करत आहेत असा पलटवार काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.
काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण?
मालेगाव स्फोटाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा हा पवित्र शब्द आहे त्याचा अपमान होता कामा नये. त्यामुळे भगवा ऐवजी सनातन दहशतवाद वापरा. जर केंद्र सरकारला वाटत होते या प्रकरणातील आरोपी निर्दोष आहेत मग २०१४ सालीच हा खटला बंद का केला नाही, भाजपा सरकारने ११ वर्ष हा खटला चालवला आणि आता कोर्टात जाऊन यात कुणी दोषी नाही म्हटले असा आरोप चव्हाण यांनी भाजपावर केला होता.