मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनानंतर मुंबईतील आणखी २ आमदाराने साथ सोडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 23:02 IST2022-06-22T22:58:33+5:302022-06-22T23:02:32+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत बंडखोर आमदारांना साद घातली. मात्र त्यानंतर मुंबईतील २ आमदार नॉटरिचेबल झाले.

मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनानंतर मुंबईतील आणखी २ आमदाराने साथ सोडली
मुंबई - मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे पक्षनेतृत्वाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडण्याचा निर्णय घेत पुन्हा मातोश्रीवर परतले आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी गर्दी केली. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेन तर मग या पदाला काय करायचं? मी मुख्यमंत्री काय पक्षप्रमुखपदही सोडायला तयार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत बंडखोर आमदारांना साद घातली. मात्र त्यानंतर मुंबईतील कुर्ला येथील शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर हे शिंदे गटात सहभागी होण्यासाठी गुवाहाटीला जाण्यास रवाना झाले. कुडाळकर हे सूरतला पोहचले असून त्याठिकाणाहून गुवाहाटीला जाणार आहेत. सकाळपर्यंत माझा विचार नव्हता मात्र काही कारणाने जावं लागतंय असं कुडाळकरांनी म्हटल्याचं झी २४ तासनं सांगितले आहे. त्याचसोबत शिवसेनेचे सदा सरवणकर हेदेखील नॉट रिचेबल झाल्याचं समोर आले आहे.
Two more Maharashtra Shiv Sena MLAs - Sada Sarvankar from Mahim constituency and Mangesh Kudalkar from Kurla constituency- have left for Surat, Gujarat: Sources
— ANI (@ANI) June 22, 2022
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
तत्पूर्वी शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील, योगेश कदम, मंजुळा गावित, चंद्रकांत पाटील हे आमदार गुवाहाटीला पोहचले आहेत. राज्यात शिवसेना-भाजपाने मिळून सत्ता स्थापन करावी अशी मागणी ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक आमदारांची आहे. पक्षातील फुट टाळण्यासाठी भाजपसोबत जाण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत माझ्यासह काही आमदारांनी विनंती केली. मात्र,याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यातच सर्वच आमदारदेखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असल्याने सेनेचे हित लक्षात घेवून, शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?
ज्या शिवसैनिकांना मी शिवसेनेचे नेतृत्व करण्यास नालायक आहे हे मला सांगावं मी पक्षप्रमुख पद सोडण्यास तयार आहे. पण तो खरा शिवसैनिक असावा. मी दोन्ही पद सोडल्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मी आनंदी आहे. दुसरा मुख्यमंत्री चालत असेल तर मला समोर येऊन सांगा. मला फोन करा, चॅनेलच्या माध्यमातून पाहिले. संकोच वाटत असेल या क्षणी मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे. पदे येतात आणि जातात, आयुष्याची कमाई पदावर असताना जनतेसाठी जी कामे केली तेच असते असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.