Join us

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरुन हटवलं, 'या' आमदाराची तात्काळ नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 15:43 IST

एकनाथ शिंदे यांनी बंड मागे घेण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. त्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत यापुढे आघाडी नको

मुंबई - शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच मोठ्या बंडाच्या पावित्र्यात असलेल्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तीन प्रस्ताव दिले आहेत. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदेंना गटनेतेपदावरुन हटविण्यात आले आहे. आता, शिंदेंच्याजागी मुंबईतील शिवसेना आमदाराला संधी देण्यात आली आहे. 

एकनाथ शिंदे यांनी बंड मागे घेण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. त्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत यापुढे आघाडी नको. त्याऐवजी शिवसेनेने भाजपासोबत युती करून सत्ता स्थापन करावी. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद द्यावं आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद द्यावं, असं आवाहन करण्यात आल्याची माहिती आहे. शिवसेनेतील या बंडाळीमुळे शिवसेनेत मोठा भूकंप झाला असून आमदारांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आता एकनाथ शिंदेंना शिवसेनेच्या गटनेते पदावरुन हटवलं आहे. तर, शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय चौधरी यांनी नेमणूक करण्यात आली आहे. अजय चौधरी हे शिवसेना शिवडी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार असून निष्ठावंत शिवसैनिक आहेत. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे. 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्याकडे २० ते ३५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे. तर पक्षांतर बंदीचा कायदा लागू होऊ नये यासाठी एकनाथ शिंदे यांना किमान ३७ आमदारांचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे. दरम्यान, आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलेल्या बैठकीमध्ये केवळ १८ विधानसभा आमदार उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे.  

एकनाथ शिंदेंचं महत्त्वाचं ट्विट

''आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही'', असे ट्विट एकनाथ शिंदेंनी केलं आहे.  

टॅग्स :एकनाथ शिंदेराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनाउद्धव ठाकरे