कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव कायम; हलक्या ते मध्यम सरी कोसळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 16:19 IST2020-10-16T16:18:52+5:302020-10-16T16:19:21+5:30
Low Pressure : मुंबईत बहुतांशी ठिकणी पावसाची विश्रांती

कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव कायम; हलक्या ते मध्यम सरी कोसळणार
मुंबई : कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव अद्यापही कायम असून, हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तर महाराष्ट्रालगतच्या अरबी समुद्रावर असतानाच हवामानात सातत्याने बदल होत आहेत. याच हवामान बदलाचा परिणाम म्हणून मुंबई शहरासह उपनगरातील पावसाचे प्रमाणदेखील कमी जास्त होत आहे. शुक्रवारीदेखील मुंबईत दुपारी ४ वाजेपर्यंत पावसाने पुर्णत: विश्रांती घेतली होती. दुपारी ३ वाजता पावसाचे ढग दाटून आले असले तरी देखील पावसाने पाठ फिरवली. दुपारी १२ वाजता तर मुंबईत रखरखीत ऊनं पडले होते. पावसाने विश्रांती घेतली असली तरी कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव कायम असल्याने हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून गेल्या गेल्या ३ दिवसापासून सोलापूर आणि लगतच्या जिल्हयात धुवांधार पाऊस पडत आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्रात तुफान पाऊस झाला आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसाची जोरदार हजेरी लागत असतानाच शुकवारी सकाळी मुंबईत मोकळे वातावरण होते. दुपारी मुंबईत रखरखीत ऊनं पडले होते. दुपारी ४ नंतर दाटून आलेल्या ढगांमुळे मोठा पाऊस होईल, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र कुठे तरी तुरळक हजेरी लावलेल्या पावसाने पुन्हा विश्रांती घेतली. दरम्यान, पावसाने पाठ फिरवली असली तरी मुंबई शहर आणि उपनगरात सायंकाळी ढगांनी केलेली गर्दी ऊशिरापर्यंत कायम होती. हवामानात झालेल्या उल्लेखनीय घडामोडींमुळे येत्या २४ तासांसाठी दक्षिण ओरिसा, आंध्रप्रदेशचा उत्तरी तट, तेलंगणा, दक्षिण छत्तीसगढ, विदर्भ, दक्षिण आणि दक्षिण पश्चिम मध्य प्रदेश, दक्षिण गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक तट, केरळ, तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी हलका ते काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. देशाच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहील.