शैक्षणिक संस्था बनत आहेत क्वारंटाईन सेंटर्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 05:59 PM2020-05-22T17:59:18+5:302020-05-22T18:36:22+5:30

जे जे स्कुल ऑफ अप्लाइड आर्टस् संस्थेचा काही भाग, सेंट झेव्हिअर्स व रुपारेल महाविद्यालयांच्या जागा पालिकेच्या ताब्यात; मात्र कुठे सहमतीची चिन्हे तर कुठे विरोधाच्या भाषेचा उमटतोय सूर 

Educational institutions are becoming quarantine centers | शैक्षणिक संस्था बनत आहेत क्वारंटाईन सेंटर्स 

शैक्षणिक संस्था बनत आहेत क्वारंटाईन सेंटर्स 

Next

 

मुंबई : मुंबईत कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना त्यांच्यासाठी उभारण्यात येणाऱ्या क्वारंटाईन सेंटर्सची अपुरी संख्या महापालिकेसाठी आणि शासनासाठी चिंतेचा विषय बनत चालला आहे.  या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन  काळात  शैक्षणिक संस्थांच्या जागांचा  ही उपयोग क्वारंटाईन सेंटर्ससाठी करून घेण्यात असून अनेक शैक्षणिक संस्था यासाठी स्वतःहून पुढे येत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत पालिका प्रशासन मुंबईतील नामांकित सेंट झेव्हिअर्स महाविद्यालय, जे जे स्कुल ऑफ अप्लाइड आर्ट्स , आणि डी जी. रुपारेल महाविद्यालयातील  जागांवर क्वारंटाईन रुग्णांची व्यवस्था करणार आहे.

 जे जे स्कुल ऑफ अप्लाइड आर्टसचा परिसर ही क्वारंटाईन सुविधांसाठी वापरण्यात येणार आहे. तेथील पालिका वॉर्ड अधिकारी ३ आठवड्यापूर्वी संकुलाच्या हॉलची पाहणी करून गेले आणि संकुलाच्या ग्राउंड फ्लोअरवरील हॉलमध्ये ८० बेड्सची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जेजे स्कुल ऑफ आर्ट्सचे संचालक राजीव मिश्रा यांनी दिली. पालिकेचे जे  कर्मचारी , डॉक्टर्स , परिचारिका दूरवरून येतात त्यांच्यासाठी इथे सोय करण्यात आली असून सध्यपरिस्थितीत कोविड युद्धात हा जे जे  अप्लाइड आर्ट्सचा छोटासा सहभाग असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.  पालीकेच्या वॉर्ड अधिकारी चंदा जाधव यांनी ही व्यवस्था आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे केली असून हे सेंटर सुरु झाल्यावर जे जे संकुलातील इतर महाविद्यालयांतील जागांची चाचपणी ही होणार असल्याचे त्यांनी सांगितले .

महानगरपालीकेने दादर येथील शुश्रूषा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यासाठी रुपारेल महाविद्यालय या आधीच ताब्यात घेतले आहे. मात्र त्याबाबतीत काहीही माहिती देण्यास महाविद्यालय प्रशासनाने नकार दर्शविला आहे. एकाच ठिकाणी क्वारंटाईन बेड्सची व्यवस्था केल्यास डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य कर्मचारी यांना वावर करणे आणि उपचार करणे दोन्ही सुलभ होत असल्याने सेंट झेव्हिअर्स महाविद्यालयाच्या संकुलातील कॅन्टीनचा आणि टेरेसचा परिसरही क्वारंटाईन सेंटरसाठी वापरण्यात येणार असून तिथे आत्तापर्यत १८० बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे तर अजून ७० बेड्सची व्यवस्था संकुलातील मॅनेजमेंट रिसर्च सेंटच्या इमारतीत करण्यात येईल अशी माहिती आहे. ज्या रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत मात्र त्यांना १४ दिवस निरीक्षणाखाली ठेवायची गरज आहे अशाची व्यवस्था येथे केली जाणार आहे. महाविद्यालयांत येणाऱ्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या सुरक्षिततेसाठी  हा परिसर बंद ठेवण्यात आला आहे. मात्र काही ठिकाणी शैक्षणिक संस्थांचा परिसर क्वारंटाईन जागेसाठी वापरण्यास येताना स्थानिक आणि पालकांचा विरोध पालिका अधिकाऱ्यांना होत आहे.

सांताक्रूझ येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलची इमारत ही क्वारंटाईन सेंटर म्हणून देण्यात आली होती. मात्र स्थानिक नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेची जागा क्वारंटाईन सेंटरला देण्यासाठी विरोध केला आहे. काही पालकांनी असा आरोप केला आहे की, शाळेने  पालकांना या योजनेला विरोध दर्शवून व्यवस्थापनाच्या बाजूने उभे रहाण्यास सांगितल्याची माहिती काही पालक देत आहेत तर काही पालकांनी शाळेच्या इमारतीत क्वारंटाईन सेंटर उभारल्यास परिसरात संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त केली. त्यामुळे स्थानिक नगरसेवक हितल गाला यांनी सोमवारी पालिकेला पत्र लिहून क्वारंटाईन सेंटर उभारण्याची प्रक्रिया स्थगित करण्याची विनंती केली आणि प्रक्रिया स्थगित करण्यात आली. मात्र गरज भासल्यास पुन्हा त्या जागेचा विचार केला जाऊ शकतो अशी महिती तेथील पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Educational institutions are becoming quarantine centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.