अमली पदार्थ तस्करी प्रकरणात ईडीची एन्ट्री, मुंबईसह दिल्लीत चार ठिकाणी छापेमारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 07:31 IST2024-10-13T07:30:30+5:302024-10-13T07:31:05+5:30
दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये तुषार गोएल, हिमांशू कुमार, औरंगजेब सिद्धीकी आणि भारत कुमार यांची नावे आहेत.

अमली पदार्थ तस्करी प्रकरणात ईडीची एन्ट्री, मुंबईसह दिल्लीत चार ठिकाणी छापेमारी
मुंबई : दोन दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ६०० किलो अमली पदार्थ जप्त केल्यानंतर आता या प्रकरणात ईडीनेही एन्ट्री केली. याप्रकरणी मुंबई व दिल्लीत चार ठिकाणी छापेमारी केली. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये तुषार गोएल, हिमांशू कुमार, औरंगजेब सिद्धीकी आणि भारत कुमार यांची नावे आहेत.
तस्करीत तुषार गोएल हा मुख्य असल्याचा पोलिसांचा दावा असून, तो या अन्य तीन साथीदारांच्या मदतीने देशभरात अमली पदार्थांचा व्यवसाय करीत होता. त्याच्या दिल्लीतील एका गोडाऊनमध्ये ५६२ किलो कोकेन आणि ४० किलो गांजा आढळून आला होता. त्याचे दोन साथीदार हिमांशू कुमार आणि भारत कुमार हे मुंबईतील असून, त्यांच्याशी निगडित मुंबईतील ठिकाणी ईडी अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. तुषार गोएल या व्यवहारासाठी दुबई आणि थायलंडमध्येदेखील जाऊन आल्याची माहिती तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना मिळाली आहे.