आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 07:37 IST2025-08-30T07:37:24+5:302025-08-30T07:37:48+5:30

पोलिसांनी मराठा आंदोलनासाठी फक्त पाच हजार आंदोलकांना मैदानात प्रवेशाची परवानगी दिली असूनही, त्याहून अधिक आंदोलकांनी मैदान गाठल्याने परिसर खचाखच भरला. वाढत्या गर्दीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याची स्थिती निर्माण होत असतानाच, दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाने गर्दी पांगवली.

During the protest, rain came to the aid of the police... | आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...

आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...

मुंबई - पोलिसांनी मराठा आंदोलनासाठी फक्त पाच हजार आंदोलकांना मैदानात प्रवेशाची परवानगी दिली असूनही, त्याहून अधिक आंदोलकांनी मैदान गाठल्याने परिसर खचाखच भरला. वाढत्या गर्दीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याची स्थिती निर्माण होत असतानाच, दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाने गर्दी पांगवली.

गर्दीमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महापालिका मार्ग, क्रॉफर्ड मार्केट, भेंडी बाजार, वाडी बंदर परिसरात वाहतूककोंडी झाली. पोलिस विभागाकडून बंदोबस्त होता. ड्रोनच्या माध्यमातूनही हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. अनेकांनी सीएसएमटी परिसरात बस व खासगी वाहने थांबविली होती.

हार्बर रेल्वेसह सीएसएमटी रेल्वे स्थानकात आंदोलकांनी गर्दी केली होती. काही जणांनी रेल्वे रुळावर उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना वेळीच अटकाव केला. स्थानकाबाहेरील गर्दी वाहनांच्या रांगा लागून कोंडी होत मुंबई पूर्ण जाम करण्यासाठी पुरेशी होती. या गर्दीवर नियंत्रण आणताना पोलिसांची दमछाक सुरू असतानाच दुपारी पावसाच्या हजेरीने आंदोलकांनी आडोसा घेण्यास सुरुवात केली. आंदोलक वेगवेगळ्या दिशेने बाहेर पडले. त्यामुळे सीएसएमटी स्थानकात गर्दीची भर पडली. मात्र, सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली.

८०० वाहनेपरत...
दुपारपर्यंत ८०० हुन अधिक वाहने परत फिरल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मात्र, एक दिवसाची मुदतवाढ मिळाल्याने पुन्हा गर्दीत भर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आंदोलकांची मुंबईवारी...
सीएसएमटी स्थानकात येणारे अनेक आंदोलक आझाद मैदानाबरोबर मुंबई दर्शन करतानाही दिसून आले. अनेकांनी फोर्ट, फॅशन स्ट्रीट तसेच मरिन लाइन्सलाही फेरफटका मारला. तर काहींची
मुंबईच्या महत्त्वाच्या ठिकाणी जाण्याची धडपड सायंकाळी दिसून आली.

चाकण ते आझाद मैदान...
रात्री १२:३० - चाकणवरून आंदोलकांचा ताफा मुंबईकडे.
३:१५ - वाजता लोणावळा घाट उतरून खोपोलीत दाखल.
पहाटे ४:०० - खालापूर तालुक्यातून पनवेलच्या हद्दीत प्रवेश.
४:४० - पनवेल पळस्पे फाट्यावरून उलवेकडे रवाना.
५:४० - पामबीच रोडवर वाशी टोलनाक्याकडे प्रस्थान.
६:१५ - वाशी टोलनाक्यावर आगमन.
६:३० - वाशी टोलनाक्यावरून मानखुर्दला रवाना.
सकाळी ९:३० - मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात दाखल.
१०:०० - मंचावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन.
१०:१० - आंदोलकांना संबोधित करून उपोषणास सुरुवात.
१०:५५ - आंदोलकांनी केली श्री गणरायाची आरती.
११:३० - अजित पवार गटाचे आ. प्रकाश सोळंके, शरद पवार गटाचे आ. संदीप क्षीरसागर मंचावर दाखल.
दु. १२:२५ - अजित पवार गटाचे आ. विजयसिंह पंडित उपोषणस्थळी.
१:०० - उद्धवसेनेचे खा. संजय जाधव मंचावर आले.
१:०५ - शरद पवार गटाचे खा. बजरंग सोनावणे यांनी घेतली भेट.
१:३० - वाहतूक नियोजन करण्याचे जरांगे पाटील यांचे आवाहन.
२:१० - उद्धवसेनेचे खा. ओमराजे निंबाळकर, आ. कैलास पाटील आले.
२:२० - शरद पवार गटाचे आ. अभिजित पाटील यांची उपस्थिती.
२:३० - शिवसंग्रामच्या अध्यक्ष ज्योती मेटे व्यासपीठावर दाखल.
२:४५ - शरद पवार गटाचे खा. नीलेश लंके आंदोलनस्थळी दाखल.
२:५५ - शरद पवार गटाचे खा. भास्कर भगरे मंचावर दाखल.

Web Title: During the protest, rain came to the aid of the police...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.