चक्काजाममुळे दुपारी गाठले कार्यालय, पावसाने रौद्ररूप धारण केल्याने अनेकजण अडकून पडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 12:34 IST2025-08-20T12:33:29+5:302025-08-20T12:34:18+5:30
मुंबईतील नोकरदार, व्यावसायिकांच्या नाकीनऊ

चक्काजाममुळे दुपारी गाठले कार्यालय, पावसाने रौद्ररूप धारण केल्याने अनेकजण अडकून पडले
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई कधीच थांबत नाही, असे म्हणतात. त्यामुळेच की काय मुंबईला ‘रेड अलर्ट’ दिला असतानाही अनेक नोकरदार, व्यावसायिक मंगळवारी पहाटेपासून घरातून बाहेर पडले. याच दरम्यान पावसाने रौद्ररूप धारण केल्याने बहुसंख्य ठिकठिकाणी अडकून पडले. घरातून सकाळी निघालेले असंख्य नोकरदार दुपारी कार्यालयात पोहोचले तर काहींना माघारी फिरावे लागले.
घाटकोपरपासून सायनपर्यंत आणि कुर्ला ते वांद्रे, कुर्ला ते सांताक्रुझ, कुर्ला ते अंधेरी, कुर्ला ते घाटकोपर, कुर्ला ते ते कलिना या मार्गांवरील वाहतूक सेवा ठप्प पडल्याचा फटका त्यांना बसला. घाटकोपर आणि कुर्ला गाठल्यानंतर मुंबईकरांना दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबईत दाखल होण्यासाठी कोणती वाहतूक सेवा उपलब्ध नसल्याने अनेक ते मुंबईच्या वेशीवर अडकून पडले.
मुंबईची रस्ते वाहतूक आणि लोकल सेवा सोमवारी पहाटेपर्यंत बऱ्यापैकी सुरू होती. मात्र, कालांतराने पावसाचा जोर वाढला आणि रस्त्यावर पाणी जमू लागले शिवाय रेल्वे ट्रॅकवर पावसाचे पाणी आले.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तैनात
सकाळी सुरू झालेला पाऊस दुपारपर्यंत वाऱ्याच्या वेगाने कोसळत असल्याने मुंबई शहरातला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, पूर्व उपनगरातला एलबीएस मार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग यासारखे मोठे वाहतुकीचे मार्ग बंद होते. सोबतच सायन आणि कुर्ल्यामध्ये रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने लोकल वाहतूक ठप्प पडली होती.
हार्बर रेल्वे मार्गावर चुनाभट्टी, कुर्ला या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने लोकल सेवा बंद पडली होती. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरू असली तरी तिला मोठा लेटमार्क लागला होता. पावसाचा मारा सुरू असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावत होते.
मेट्रोचा घेतला अनेकांनी आधार
दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबईत दाखल होण्यासाठी मुंबईकरांनी लोकल पकडली. परंतु घाटकोपरच्या पुढे लोकल जात नव्हती. त्यावर पर्याय म्हणून प्रवाशांनी घाटकोपर रेल्वे स्थानकात दाखल झाल्यानंतर घाटकोपर ते अंधेरी या मेट्रो सेवेचा आधार घेतला.
सर्वाधिक फटका कुर्ला, मरोळ भागाला
मंगळवारी सकाळी पडलेल्या मोठ्या पावसाचा सर्वाधिक फटका घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला, सायन, वांद्रे, सांताक्रुझ, कलिना, अंधेरी, मरोळ, साकीनाका या परिसरात मोठ्या प्रमाणावर बसला. सकाळपासून दुपारपर्यंत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने रस्ते वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती.
सोमवारी रात्री साडेबारा वाजल्यापासून मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात मोठ्या पावसाने सुरुवात केली. मध्यरात्री दोन वाजता हवामान खात्याने पुढील तीन ते चार तासांचा मोठ्या पावसाचा अंदाज वर्तवला. त्यानुसार सकाळी साडेसहा वाजेपर्यंत संपूर्ण मुंबईत मोठ्या पावसाने हजेरी लावली. दरम्यानच्या काळात काही ठिकाणी पाऊस विश्रांती घेत असतानाच मंगळवारी सकाळी साडेसहा वाजल्यानंतर पुन्हा मोठा पाऊस पडू लागला.