Due to the excessive force of Mamata, Hindu place in Bengal came to haunt - Uddhav Thackeray | ममतांच्या अतिरेकामुळेच बंगालात सुस्तावलेला हिंदू जागा झाला- उद्धव ठाकरे
ममतांच्या अतिरेकामुळेच बंगालात सुस्तावलेला हिंदू जागा झाला- उद्धव ठाकरे

 मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ममता बॅनर्जींवर टीका केली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी ममता बॅनर्जींची भेट घेऊन मोदींवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला होता. भाजपाबरोबर युती झाल्यानंतर शिवसेनेनं थेट ममता बॅनर्जींवरच निशाणा साधला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून ममतांचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. ममता यांनी अतिरेक केला नसता तर बंगालात सुस्तावलेला हिंदू जागा झाला नसता. स्वतःच्या अधःपतनास ममता या स्वतःच जबाबदार आहेत, असं शिवसेनेच्या मुखपत्रातून मत व्यक्त करण्यात आलं आहे.

मुठीतून वाळू सरकावी तसे राज्य ममतांच्या हातून निसटत आहे. ‘जय श्रीराम’ बोलणे हा ममतांच्या राज्यात अपराध आहे काय? ‘जय श्रीराम’ला उत्तर देण्यासाठी कोलकात्यात आता ‘जय हिंद, जय बंगाल’चे फलक तृणमूलवाले लावणार आहेत. ही एक प्रकारची अस्वस्थता आहे. राज्य टिकवण्यासाठी अशा खटपटी व लटपटी सुरू आहेत. त्याने काय होणार? बंगालचा गुजरात झाला आहे. उद्या अयोध्या आणि वाराणसीसुद्धा होईल. प्रभू श्रीरामांचा कोप झाल्यावर दुसरे काय होणार! हिंदुत्व भडकले आहे. ममतांमुळे हे झाले, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे
- बंगालचा गुजरात करू देणार नाही, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे. राजकीय भाषेत यास इशारा किंवा धमकी म्हटले जाते. असे इशारे, धमक्या व रक्तपात यामुळे प. बंगालचे जनजीवन सध्या ढवळून निघाले आहे. 
- लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून आतापर्यंत बंगालात जो हिंसाचार उसळला आहे त्यात पाचशेहून जास्त कार्यकर्त्यांचे खून झाले व हे खूनसत्र अद्यापही सुरूच आहे. 
- ज्यांच्या हत्या झाल्या ते बहुतेक सर्वच लोक भाजपचेच कार्यकर्ते आहेत असे म्हटले जाते. तृणमूलचे लोकही मारले गेले असे ममतांचे म्हणणे आहे. भाजपच्या प्रचारासाठी अमित शहा कोलकात्यात गेले तेव्हा त्यांच्या प्रचार शोभायात्रेत ‘राडा’ झाला. 
- ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळय़ाची मोडतोड झाली. हा पुतळा आता नव्याने उभा केला व त्याचे अनावरण करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा एकदा इशारे व धमक्यांच्या भाषेत बोलल्या. 

- ममता म्हणतात, ‘भाजप बंगालचा गुजरात करू पाहत आहे. मी तुरुंगात जाण्यास तयार आहे, पण हे मी कदापि होऊ देणार नाही.’ 

- ममता पुढे सांगतात, ‘बंगाल आणि बंगाली जनतेच्या भावना आणि तेथील संस्कृतीला जर कोणी हानी पोहोचवत असेल तर त्यांना मी सोडणार नाही.’ 

- प. बंगालची स्थिती नेमकी काय आहे व भविष्यात कोणते स्फोट घडणार आहेत त्याचा हा ट्रेलर आहे. ज्यांच्या शोभायात्रेच्या दरम्यान हल्ले झाले ते अमित शहा आता देशाचे गृहमंत्री झाले आहेत.
- ममतांना जशास तसे उत्तर देण्याची क्षमता अमित शहा आणि भाजपात आहे. प. बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी गृहमंत्री अमित शहा यांना भेटून प. बंगालच्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली. 
- प. बंगालात जे घडले त्याला ‘गुजरात पॅटर्न’ जबाबदार असल्याचे ममता म्हणतात. त्यामुळे गुजरात होऊ देणार नाही याचा काय अर्थ घ्यायचा? 
- कोलकाता व इतर शहरांत जो गुजराती समाज आहे त्यांना राज्यातून बाहेर काढण्याची ही तयारी आहे काय? मोदी व शहा हे गुजराती आहेत. म्हणून त्यांच्याविषयी अशी भाषा वापरणे योग्य नाही. त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. 
- मोदी हे अप्रत्यक्ष तर अमित शहा हे उघडपणे हिंदुत्वाची भूमिका घेतात. प. बंगालात ममता यांनी सेक्युलरपणाच्या नावाखाली बांगलादेशी मुसलमानांचे लांगुलचालन चालवले होते. 
- तो पॅटर्न त्यांच्यावर उलटला. या लांगुलचालनाला आव्हान देण्यासाठी भाजपने ‘जय श्रीराम’चे नारे दिले व हिंदू समाजाने गुदमरलेला श्वास मोकळा केला. प. बंगालात भाजपचे 18 खासदार निवडून आले. 


Web Title: Due to the excessive force of Mamata, Hindu place in Bengal came to haunt - Uddhav Thackeray
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.