मेट्रोच्या डेब्रिजमुळे पर्जन्य जलवाहिन्या तुंबण्याची भीती, महापालिकेसमोर नवा पेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 03:24 IST2019-05-05T03:24:31+5:302019-05-05T03:24:47+5:30
मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी रस्ते खोदल्याने वाहतूककोंडी होत असल्याच्या तक्रारी अनेक वेळा होत असतात. मात्र या खोदकामामुळे वेगळाच धोका महापालिकेच्या समोर उभा राहिला आहे.

मेट्रोच्या डेब्रिजमुळे पर्जन्य जलवाहिन्या तुंबण्याची भीती, महापालिकेसमोर नवा पेच
मुंबई - मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी रस्ते खोदल्याने वाहतूककोंडी होत असल्याच्या तक्रारी अनेक वेळा होत असतात. मात्र या खोदकामामुळे वेगळाच धोका महापालिकेच्या समोर उभा राहिला आहे. या कामामुळे निर्माण झालेला डेब्रिज (दगड, माती) पर्जन्य जलवाहिन्यांमुळे वाहून गेल्यास गटारे, नाले पावसाळ्यात तुंबण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मेट्रो व मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कामामुळे निर्माण झालेला डेब्रिज नियमित उचलला जाईल, यासाठी सर्व साहाय्यक आयुक्तांनाच डोळ्यांत तेल घालून सतर्क राहावे लागणार आहे.
मुंबईत अनेक ठिकाणी मेट्रो रेल्वेच्या कामानिमित्त खोदकाम करण्यात आले आहे. तसेच एमएमआरडीएमार्फतही काही विकासकामे सुरू आहेत. या कामांमुळे अनेक भागांमध्ये रस्ते अरुंद झाले असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अशा अनेक तक्रारी येत असतात. परंतु या प्रकल्पाच्या कामामुळे खरी अडचण पावसाळ्यात निर्माण होण्याची भीती आहे.
अखेर पालिकेला आली जाग
धोकादायक वृक्ष प्रत्येक पावसाळ्यात मृत्यूचा सापळा ठरत आहेत. गेल्या वर्षीही वृक्ष कोसळून निष्पाप पादचाऱ्यांचा बळी गेला होता, तसेच मोडकळीस आलेल्या इमारतींचा धोका यावर्षीही कायम आहे, परंतु निवडणुकीच्या काळात महापालिकेचे या कामांकडे दुर्लक्ष झाल्याची नाराजी नगरसेवकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे आयुक्तांनी या कामांचा आज आढावा घेतला. मुंबईत सुमारे सहाशेहून अधिक इमारती धोकादायक आहेत. या इमारतींची दुरुस्ती अथवा पाडण्याचा निर्णय पावसाळ्यापूर्वी घेणे आवश्यक आहे, तसेच डोंगर उतारावरील वस्त्यांवर दरडी कोसळण्याचा धोका असतो. या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देणारे फलक लावण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
आयुक्तांनी दिले पाहणीचे आदेश
पालिका आयुक्त अजय मेहता यांनी मासिक आढावा बैठकीत चिंता व्यक्त केली. हा डेब्रिज पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये अडकून राहिल्यास पावसाळ्यात पाण्याचा निचरा होऊ शकणार नाही. त्यामुळे आतापासून सर्व साहाय्यक आयुक्तांनी सतर्क राहून मेट्रो रेल्वे व एमएमआरडीएच्या कामाची पाहणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. डेब्रिज पर्जन्य जलवाहिन्यांमधून वाहून येणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना त्यांनी करण्यात आली आहे.
साथीच्या आजारांबाबतही सतर्कता
पावसाळ्यात पाणी साचणाºया ठिकाणी मलेरिया, डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होते. यामुळे रुग्ण वाढण्याचा धोका असतो. हे टाळण्यासाठी खबरदारी म्हणून पालिकेने काही दिवसांपूर्वी डासांची अशी उगम स्थळे नष्ट करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. या कामाची माहिती आजच्या बैठकीत घेण्यात आली. हे रोग पसरविणाºया डासांची उत्पत्ती घरांतही होत असल्याने, याविषयी जनजागृती प्रभावीपणे करण्याच्या सूचना महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याला आयुक्तांनी दिल्या आहेत.
पावसाळ्यात नाले तुंबून मुंबईत पाणी भरण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे आयुक्तांनी आढावा बैठकीत सर्व साहाय्यक आयुक्तांकडून माहिती घेतली. तसेच मेट्रो रेल्वेच्या कामाचाही फटका पावसाळ्यात बसण्याची शक्यता लक्षात घेऊन समन्वय बैठक बोलावली आहे. त्यानुसार एमएमआरडीए, मुंबई मेट्रो व महापालिकेतील समन्वयनात्मक बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
- प्रवीण दराडे, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प), एमएमआरडीए