मंगला एक्स्प्रेसमध्ये पकडले ३६ कोटींचे ड्रग्ज; मेथाफेटामाईनसह कोकेनही आढळले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 10:01 IST2025-07-21T10:00:53+5:302025-07-21T10:01:59+5:30
शुक्रवारी मंगला एक्स्प्रेस पनवेल स्टेशनवर आल्यावर नायजेरियन महिलेला पकडत ही कारवाई केली आहे.

मंगला एक्स्प्रेसमध्ये पकडले ३६ कोटींचे ड्रग्ज; मेथाफेटामाईनसह कोकेनही आढळले!
मुंबई : मध्य रेल्वेचे रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), अमली पदार्थ नियंत्रण विभाग (एनसीबी), बंगळुरू आणि गुन्हे गुप्तचर शाखा (सीआयबी) कुर्ला यांनी संयुक्त कारवाई करीत अमली पदार्थांची तस्करी रोखत अंदाजे ३६ कोटी किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या पथकांनी शुक्रवारी मंगला एक्स्प्रेस पनवेल स्टेशनवर आल्यावर नायजेरियन महिलेला पकडत ही कारवाई केली आहे.
मंगला एक्स्प्रेसमधून अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती एनसीबीच्या बंगळूर युनिटला मिळाली. या आधारे एक संयुक्त पथक स्थापन करण्यात आले. मंगला एक्स्प्रेस पनवेल रेल्वे स्थानकात आल्यावर पथकाने शोध घेण्यास सुरू केला. एक्स्प्रेसमधील ए-२ डब्याच्या सीट क्रमांक २७ वर एक नायजेरियन महिला प्रवासी बॅगेसह संशयास्पदरीत्या आढळली. पथकाने चौकशी केली असता तिने तिचे नाव इटुमुडॉन डोरिस आणि बाळाचे नाव मिरॅकल असे सांगितले. तिच्याकडे नायजेरियन पासपोर्ट होता. दरम्यान पथकाने कसून चौकशी केली असता महिलेने अमली पदार्थाची तस्करी करीत असल्याची कबुली दिली.
मेथाफेटामाईनसह कोकेन आढळले!
पनवेलमधील आरपीएफ चौकीत तिला आणल्यानंतर तिच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. तिच्या प्रवासी बॅगेत पथकाला ‘व्हिंटेज’ लेबल असलेली रबरमध्ये गुंडाळलेली काळ्या रंगाचे पॅकेट सापडले. चाचणी केल्यावर हे दोन किलो कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. अन्य पिशवीमध्ये मुलांची बॅग आढळली. या बॅगमध्ये एक ‘केलॉग्ज कॉर्न फ्लेक्स’ आणि दुसरी ‘बोंगची परफेक्ट रोल’ असलेल्या पांढऱ्या स्फटिकासारखे पदार्थ आढळले. तपासणीत हे मेथाफेटामाईन नावाचे अंमली पदार्थ असल्याचे सिद्ध झाले. त्याचे वजन १.४८८ किलो होते. दोन्ही या अंमली पदार्थांची एकूण बाजार किंमत एकूण ३६ कोटी रुपये आहे.