शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 05:57 IST2025-06-23T05:56:38+5:302025-06-23T05:57:25+5:30

तो सिएरा लिओनहून मुंबई विमानतळावर आला होता. त्याने भारतात ड्रग्ज तस्करीच्या उद्देशाने  कॅप्सूल गिळल्याची कबुली दिली. 

Drugs worth Rs 23 crores hidden in body seized; Five arrested at Mumbai airport | शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

मुंबई : सीमाशुल्क विभाग व महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) अमली पदार्थ तस्करीप्रकरणी  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर  तीन कारवायांत २३ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. 

पहिल्या कारवाईत थायलंडहून उशांमध्ये लपवून आणलेला १२ किलो हायड्रोपोनिक गांजा हस्तगत केला. दुसऱ्या कारवाईत परदेशी नागरिकाच्या पोटातून कोकेनच्या ६७ कॅप्सूल बाहेर काढल्या, तर तिसऱ्या कारवाईत विमानतळावरील कर्मचाऱ्यांकडून सव्वाचार कोटींचे सोने जप्त केले आहे. 

बँकॉकहून काही जण गांजा घेऊन येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार विमानतळावर शुक्रवारी बँकॉकहून आलेल्या दोघांना सीमाशुल्क विभागाने अडवले. 

त्यांच्या बॅगेतील उशांच्या कव्हरमध्ये व्हॅक्यूम सील पद्धतीने लपवलेला हायड्रोपोनिक गांजा सापडला. दोन्ही आरोपींकडून ११ कोटी ८८ लाख रुपयांचा ११ किलो ८८१ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. 

कोकेनच्या ६७ कॅप्सूल 

‘डीआरआय’ने अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आयव्हरी कोस्ट देशाच्या नागरिकाविरोधात १९ जूनला विमानतळावर कारवाई केली. तो सिएरा लिओनहून मुंबई विमानतळावर आला होता. त्याने भारतात ड्रग्ज तस्करीच्या उद्देशाने  कॅप्सूल गिळल्याची कबुली दिली. 

त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केले असता त्याच्या पोटातून ६७ कॅप्सूल काढल्या. त्यात १,१३० ग्रॅम कोकेन सापडले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत ११ लाख ३९ हजार रुपये आहे. 

मेण वितळवताच सापडली २४ कॅरेट सोन्याची भुकटी 

सीमाशुल्क विभागाच्या गुप्तवार्ता कक्षाच्या (एआययू) अधिकाऱ्यांनी रविवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना अडवले. 

झडतीदरम्यान त्यांच्या खिशात ठेवलेल्या मोज्यांमध्ये मेणबत्ती लपवलेली आढळली. त्यातील मेण वितळवताच  २४ कॅरेट सोन्याची भुकटी सापडली. 

आरोपींकडून सव्वाचार कोटी किमतीचे एकूण चार किलो ४४० ग्रॅम सोने जप्त केले आहे.  दोघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

Web Title: Drugs worth Rs 23 crores hidden in body seized; Five arrested at Mumbai airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.