कुर्ला, गोवंडीमधून कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त, परदेशी नागरिकासह नऊ जणांना ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 11:44 IST2025-10-12T11:43:49+5:302025-10-12T11:44:15+5:30
अमली पदार्थांचा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या अधिकाऱ्यांनी वाकोला परिसरात कारवाई करत एका नायजेरियन व्यक्तीकडून ५२३ ग्रॅम कोकेन हस्तगत केले...

कुर्ला, गोवंडीमधून कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त, परदेशी नागरिकासह नऊ जणांना ठोकल्या बेड्या
मुंबई : कुर्ला, गोवंडी, माझगाव, बोरिवली, वाकोला परिसरात विविध प्रकारच्या अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एकूण नऊजणांना अटक केली. यामध्ये एका परदेशी नागरिकाचा समावेश आहे.
अमली पदार्थांचा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या अधिकाऱ्यांनी वाकोला परिसरात कारवाई करत एका नायजेरियन व्यक्तीकडून ५२३ ग्रॅम कोकेन हस्तगत केले. त्याची किंमत ५ कोटी २३ लाख रुपये आहे, तर कुर्ला-सीएसटी, माझगाव, घोडपदेव, बोरवली या परिसरातून एमडीची विक्री करणाऱ्या पाचजणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण ५४ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
मानसिक उपचाराची औषधे हस्तगत
अमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटने अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करत त्यांच्याकडून २४ हजार ९०० मानसिक उपचाराकरिता वापरली जाणारी औषधे जप्त केली आहेत.
औषधाची किंमत एक कोटी ३५ लाख असून, या प्रकरणी तीनजणांना अटक करण्यात आली आहे. या सर्व कारवायांदरम्यान एकूण सात कोटींचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत.