अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 06:28 IST2025-10-11T06:28:34+5:302025-10-11T06:28:49+5:30
गेल्या काही वर्षांपासून या दोघांनी अमलीपदार्थ विक्रीतून अनेक मालमत्ता खरेदी केल्या आहेत. त्यांचा शोध आता ईडीने सुरू केला आहे.

अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम याच्या टोळीशी निगडित असलेल्या फैजल जावेद शेख व अलफिया फैजल शेख या दोघांनी अमलीपदार्थांच्या व्यवहारातून निर्माण केलेल्या मालमत्तेच्या शोधासाठी ईडीने मुंबईत बुधवारी केलेल्या छापेमारीत १०० कोटींच्या बेनामी व्यवहारांची कागदपत्रे ईडीच्या हाती लागली आहेत. या कारवाईत ईडीच्या अधिकाऱ्यांनी ४२ लाखांची रोख, ३ सेकंड हँड आलिशान गाड्या, मालमत्तांची कागदपत्रे, बँक लॉकरची कागदपत्रे, डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत.
गेल्या काही वर्षांपासून या दोघांनी अमलीपदार्थ विक्रीतून अनेक मालमत्ता खरेदी केल्या आहेत. त्यांचा शोध आता ईडीने सुरू केला आहे. कुख्यात अमलीपदार्थ तस्कर सलिम डोला याच्या माध्यमातून हे दोघे जण हा व्यवसाय करत होते. अमलीपदार्थ विक्री प्रकरणात डोला याचा शोध सुरू असून, त्याची माहिती देणाऱ्यास एनसीबीने बक्षीसही जाहीर केले. दाऊदच्या टोळीशी संबंधित असलेल्या फैजल याला २०२३ मध्ये एनसीबीने अटक केली असून, त्यानंतर त्याला आर्थर रोड कारागृहात ठेवले होते. मात्र, तेथून तो सक्रिय होऊ नये यासाठी त्याला चेन्नई कारागृहात हलविण्यात आले आहे.