पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 07:01 IST2025-08-21T07:00:36+5:302025-08-21T07:01:06+5:30
जोरधारा अशाच कोसळत राहिल्या तर १९५८ या वर्षातील पाऊस ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याची शक्यता आहे

पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: लोकलसोबतच रस्ते वाहतुकीला ब्रेक लावत मिठी नदीला ओव्हरफ्लो करणारा पाऊस मुंबईत गेल्या २४ तासांत तब्बल २०९ मिमी कोसळला. ऑगस्ट महिना संपण्यास १० दिवस शिल्लक असून, जोरधारा अशाच कोसळत राहिल्या तर १९५८ या वर्षातील पाऊस ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट २०२० मध्ये १ हजार २४० मिमी पाऊस पडला होता, अशी माहिती हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी दिली. २०२० नंतर पाच वर्षांनी २०२५ सालच्या ऑगस्ट महिन्यात मोठ्या पावसाची नोंद झाली. असे असले तरी पावसाने अद्याप २०२० सालचा आपला रेकॉर्ड मोडलेला नाही. आजपर्यंत ऑगस्ट महिन्यातील पावसाची नोंद १ हजार १ मिमी झाली आहे. २०२० चा रेकॉर्ड मोडण्यासाठी आणखी २०० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडणे अपेक्षित आहे. तत्पूर्वी ऑगस्ट १९५८ मध्ये १ हजार २५० मिमी पाऊस पडला होता. ऑगस्ट महिन्यातील आतापर्यंतचा ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ आहे. पुढील दहा दिवसांत पावसाचा जोर कायम राहिला तर हा रेकॉर्डही तुटेल. दरम्यान, रविवारपर्यंत हलका पाऊस पडेल. गणेशोत्सवात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. या काळात मुसळधार पावसाची शक्यता नसली तरी सरी कोसळणार आहेत.
३१ वृक्ष कोसळले
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात पाच दिवसांत तब्बल ७२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून या कालावधीमध्ये ३१ वृक्ष कोसळले आहेत. तर बुधवारी पहाटेपासूनच पावसाचा जोर कमी झाल्याने सखल भागात साचलेले पाणी ओसरू लागले आहे.
दोन दिवस अखंड सुरू असलेल्या पावसाने बुधवारी ठाण्यासह जिल्ह्यात केवळ मॉर्निंग शिफ्ट केली. दुपारी १२ नंतर पावसाने विश्रांती घेतली. २४ तासांत जिल्ह्यात १७५ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. मागील दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांचे जनजीवन विस्कळीत झाले. पुरामुळे जीवितहानी होऊ नये, यासाठी प्रशासनाने खबरदारी म्हणून ६१० नागरिकांचे स्थलांतर केले आहे.
मंगळवारी सकाळी साडेआठपासून बुधवारी सकाळी साडेआठपर्यंत पडलेला पाऊस (मिमीमध्ये)
- पवई २२७
- बीकेसी १८७
- वरळी १७८
- कुलाबा १५७
- ठाणे २०७
- पनवेल २३३
- वाशी २०१
- कल्याण १८२
- अंबरनाथ १७१