Join us

स्मारकाच्या राजकारणात शिवाजी पार्कचा बळी नको, लता मंगेशकर यांच्या स्मारकाच्या मागणीला मनसेचा विरोध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 06:59 IST

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात ट्विट करत पक्षाची भूमिका मांडली. ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान दादरवासीयांनी खेळण्यासाठी अनेक वेळा संघर्ष करून अतिक्रमणापासून वाचवले आहे. तुमच्या राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका, ही विनंती,’ असे देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे खेळाचे मैदान आहे. ते खेळासाठी राहायला हवे. भाजप-शिवसेनेच्या राजकारणात मैदानाचा बळी घेऊ नका, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवाजी पार्क येथे भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मारकाच्या मागणीला ठाम विरोध केला आहे.

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात ट्विट करत पक्षाची भूमिका मांडली. ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान दादरवासीयांनी खेळण्यासाठी अनेक वेळा संघर्ष करून अतिक्रमणापासून वाचवले आहे. तुमच्या राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका, ही विनंती,’ असे देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना देशपांडे म्हणाले की, ‘शिवाजी पार्क मैदानात बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक आहे. मग, तिथे लता मंगेशकर यांचे स्मारक का नको, या मागणीला अर्थ नाही. हे खेळाचे मैदान आहे, ते तसेच राहायला हवे. भाजप आणि शिवसेनेतील कूरघोडीच्या राजकारणात मैदानाचा बळी देऊ नका. 

‘हे लतादीदींनाही आवडले नसते’- मुलांच्या खेळाच्या मैदानावर आपले स्मारक व्हावे, हे लतादीदींनाही आवडले नसते. त्यांचे खेळावर प्रेम होते, क्रिकेटवरचे त्यांचे प्रेम सर्वश्रूत आहे. - याच शिवाजी पार्कने सचिन तेंडुलकरसारखे महान खेळाडू देशाला दिले. उद्या मैदानच राहिले नाही तर नवे सचिन घडणार कसे,’ असा प्रश्नही संदीप देशपांडे यांनी केला.

टॅग्स :महाराष्ट्र नवनिर्माण सेनासंदीप देशपांडेमनसेभाजपाशिवसेना