Join us

‘अब्दुल कलाम यांना बदनाम करण्याचे पाप करू नये’; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 01:13 IST

एका देशभक्ताला बदनाम करण्याचे पाप पाटील यांनी करू नये, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.

मुंबई : देशाचे दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती केले हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे विधान हास्यास्पद आहे. त्यांनी ‘साठी बुद्धी नाठी’ ही म्हण सार्थक करून दाखवली आहे. कलाम यांचे देशासाठीचे योगदान लक्षात घेऊन तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात ते सर्वसंमतीने राष्ट्रपती झाले होते. त्यांची निवड मोदींनी केली होती, असे म्हणून एका देशभक्ताला बदनाम करण्याचे पाप पाटील यांनी करू नये, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.

ते म्हणाले की, वाजपेयी यांनी गोध्रा दंगलीनंतर नरेंद्र मोदींना राजधर्माचे पालन करण्याचा आदेश दिला होता; पण तो त्यांनी न पाळता मूठभर लोकांसाठी काम केले. कलाम यांनी देशाला २०२० मध्ये जागतिक महासत्ता करण्याचे स्वप्न दाखवून एक कार्यक्रमही दिला होता; पण मोदी यांनी त्यांच्या विचारांनाच तिलांजली दिली. कोणत्याही गोष्टीचे श्रेय त्यांना देण्याचा भाजपा नेत्यांचा आटापीटा असतो तेच पाटील यांनी केले; पण वस्तुस्थिती लोकांना माहिती आहे, असेही लोंढे म्हणाले.

टॅग्स :नरेंद्र मोदीकाँग्रेसभाजपा